राकेश आसोले चित्रा न्युज
धुळे - शिरपूर पोलिसांनी स्वतःच्या तीन वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके घालून तिची हत्या करून मृतदेह पुरणाऱ्या नराधम बापाला अटक केली आहे. ही खुनाची घटना सहा जूनला शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावात घडली होती. पूजा अनिल पावरा (वय तीन) असे मृत मुलीचे नाव आहे. ती संशयित अनिल गुलाब पावरा याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झाला होता. अनिल पावरा तिला सांभाळत होता.
अनिल पावरा याने दुसरे लग्न केले होते, परंतु दुसरी बायकोही त्याला सोडून गेली. सहा जूनला रात्री मद्याच्या नशेत असलेल्या अनिल पावरा यांनी मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खून केला. सहा जूनला सकाळी तिचा मृतदेह स्वतःच्या राहत्या घरामागे जमिनीत खड्डा करून पुरला. अनिल पावरा यांच्या घरापासून काही अंतरावर त्याचे नातेवाईक राहतात. दोन दिवस पूजा पावरा दिसत नसल्यामुळे त्यांनी चौकशी केली असता, अनिल पावरा यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी पोलीस पाटील पंकज पावरा यांना बोलावून कसून विचारणा केली.
अनिल पावरा यांनी मुलीचा खून केल्याची कबुली दिली. पंकज पावरा यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी जयपाल हिरे व सहकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे आणि संशयिताला अटक करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या