पत्रकारांची लेखणी ही तलवारी पेक्षा तीक्ष्ण आहे. अन्याय, अत्याचार , गुंडागिरी, भ्रष्टाचार या विरुद्ध लढताना फक्त लेखणी चालवा, समोरचा बरोबर घायाळ होईल. जे पत्रकार खऱ्या बातम्या देण्यास घाबरतात. त्यांनी पत्रकारिता न करता आलू भज्जे काढतच राहाव्यात. असे माझे मत आहे.
पत्रकारिता जीवनाची खरी सेवा आहे. ढोंग, विषमता आणि अन्याय ह्यांच्या विरुद्ध उपसलेली ती तलवार आहे. सत्य, समता आणि स्वातंत्र्य यांच्या आराधनेची ती पूजा आहे. पत्रकारांची लेखणी ही सत्तेसाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायाची तलवार आहे. पत्रकाराच्या लेखणीला तलवारीची धार नसेल , तर सत्य सांगण्याचा आणि न्याय देण्याचा धंदा त्याला यशस्वीपणे करता येणार नाही. त्याने "पत्रकार " होण्याऐवजी " पात्रकार " व्हावे असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. पण आजकाल अर्धा हळकुंडात न्हालेल्या ' पत्रक ' कारांनी पत्रकारितेचा धंदा मांडला आहे. पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी सुरू केली आहे.
जो पत्रकार सत्य वागतो, सत्य लिहितो त्याविरुद्ध षडयंत्र केले जात आहे. दुकानदारी करणारे एकत्र येतात आणि सत्यवादी पत्रकार विरुद्ध मोहीम राबवली जाते. दोन नंबर धंदेवाल्यास हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जातात. अशा लोकांचे जागोजागी पीक वाढले आहे. त्यात बिन कामाचे तन वाढले आहे. ज्यास चार ओळीची बातमी सुद्धा नीट लिहिता येत नाही ? ते पत्रकार म्हणून मिरवत आहेत. समाजाने अशा लोकांना खड्डया प्रमाणे बाजूला ठेवले पाहिजे. जे सत्य लिहितात. अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडतात. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत.
माध्यमांचे काम माहिती देणे ,प्रशिक्षण, शिक्षण करणे, मनोरंजन करणे' प्रबोधन करणे असते. असे सांगितले जाते. लोकशाहीत माध्यमांचे मोठे महत्त्व असते , त्यामुळे ती माध्यम टिकली पाहिजेत, त्यांच्या संवर्धनासाठी निर्भीड वातावरण असण्याची गरज आहे. पत्रकारिता हा काही प्रामुख्याने पैसे कमावण्याचा , नफा कमावण्याचा धंदा नसतो, असेही सांगितले जाते. माध्यमाचे काम सकळजणांना शहाणे करण्याचे असले पाहिजे. माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचे व्रत सोडू नये अशीही अपेक्षा असते. पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरू आहे. त्यावर तटस्थ भाष्य करून दिशा देणे ही अपेक्षित असते. म्हणून पत्रकारितेला व्यवसाय म्हटले जात नाही तर त्याला पेशा अर्थात व्रत, वसा म्हणून स्वीकारावं असेही सांगितले जाते.
पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सद्सत् विवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्या पर्यंत, बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे, असेही अपेक्षित असते. म्हणून पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावें. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्रांचे नावं ‘मूकनायक’ ठेवले होते. पत्रकारांनी लोकांना नवी दृष्टी द्यावी, लोकांना डोळस करावे. पत्रकारांनी लोकप्रिय समजुती धुडकावत आपल्या श्रद्धा स्थानांची चिकित्सा तटस्थपणाने करावी. त्यामुळे पत्रकार समाजातील काही घटकांच्या हितसंबंधांना धक्के देताना दिसतात. पण असे धक्के स्वीकारण्याची ज्या समाजाची मानसिकता नसते, तो समाज विकसित होऊ शकत नाही. माध्यमाने निरपेक्ष, पूर्व ग्रहदुषितपणे विषय मांडू नयेत, अशीही अपेक्षा असते. त्यातून पत्रकार खरच आपले कर्तव्य समर्थपणे जेव्हा पूर्ण करत असतो, तेव्हा व्यवस्था त्यांच्या बाजुने उभी राहील, असे नाही. अनेक घटकांना सुखावताना काही घटकांची नाराजीही पत्रकारांना ओढवून घ्यावी लागते.
लोकशाहीवादी राजकीय व्यवस्था असणाऱ्या देशातील पत्रकारांचे जीवन सुरक्षित राहिले नाही. युद्ध, दहशतवादी संघटनांच्या कारवायांबरोबरच हितसंबंधांच्या आड येणाऱ्या पत्रकारांना मोठ्या प्रमाणात जीव गमवावा लागतो आहे. महाराष्ट्र सरकारने देशात पत्रकारांच्या सुरक्षितेसाठी कायदा मंजूर केला आहे. पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबतचा हा कायदा सध्या राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे पत्रकारांना सुरक्षेचे कवच प्राप्त होईल. कमिटी टु प्रोटेक्ट जर्नालिस्ट (C P J) या जागतिक पातळीवरच्या संघटनेच्या १९९२ पासून २०१६ पर्यंत अहवालात जगभरात १२३६ पत्रकारांच्या हत्त्या करण्यात आल्या आहेत. जगभरातील कारागृहात २५९ पत्रकारांना डांबण्यात आले आहेत. त्यांचा आवाज बंद करण्यात आला आहे. सिरिया, इराक, आफगाणिस्तान आणि लिबिया या देशातील अंतर्गत असंतोषाला पत्रकारांना बळी पडावे लागत आहे. यात मेक्सिमो, फिलिपाईन्स, रशिया या देशातील परिस्थिती फारशी चांगली नाही. संबंध जग सध्या अस्वस्थतेच्या, भितीच्या सावटाखाली आहे. शिवाय असे वाटावे अशी परिस्थिती असताना विचार करण्याची क्षमता न्युजपेपर चालविणाऱ्या संपादकाकडे नाही. असा मला वाटते आहे. लिहण्यात चुका झाल्या असतील तर मला क्षमा द्यावी. हिच अपेक्षा 🙏


0 टिप्पण्या