रुपाली डोंगरे चित्रा न्युज
हिंगोली :-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील नऊ महिन्यांपासून लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या शनिवारी ता. ६ मराठवाड्यातील पहिल्या संवाद रॅलीसाठी हिंगोलीकर सज्ज झाले आहेत. बळसोंड भागात ५१ उखळी तोफांची सलामी दिली जाणार असून ठिकठिकाणी सुमारे २००० स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. या रॅलीसाठी शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. रॅलीत लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
राज्यातील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे तसेच सगेसोरऱ्यांची अंमलबजावणी करावी यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील ९ महिन्यापासून लढा देत आहेत. अंतरवाली सराटी येथे उपोषण त्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता मराठवाडयात ता. ६ जुलै ते ता. १३ जुलै या कालावधीत शांतता संवाद रॅली काढली जाणार आहे. या रॅलीची सुरवात हिंगोली येथून होणार आहे. या रॅलीत लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
दरम्यान, हिंगोली येथील रॅलीसाठी हिंगोलीकर सज्ज झाले आहेत. शहरात सर्वच ठिकाणी भगवे ध्वज उभारण्यात आले असून स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी १० वाजता बळसोंड येथील शिवनेरी चौकात जेसीबीमधून पुष्पवृष्टी करून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आगमन होणार असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन केले जाणार आहे. यावेळी ५१ उखळी तोफांची सलामी दिली जाणार आहे. त्यानंतर शांतता संवाद रॅली काढली जाणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या रॅलीचे इंदिरा गांधी पुतळा येथे विसर्जित होणार आहे.


0 टिप्पण्या