Ticker

6/recent/ticker-posts

गणेश वॉर्ड जि. प. प्राथमिक शाळेसमोर गतिरोधक देण्याची मागणी

 शाळा व्यवस्थापन समितीची मागणी 

सोमवार पर्यंत नगरपरिषद प्रशासनाला गर्भित इशारा 

रवी भोंगाने साकोली 
साकोली:-तालुक्यात अनेक शाळा रस्त्यावर आहेत. त्यातच १ जुलै २०२४ पासून शाळेचे सत्र सुरू झाले. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येऊ लागले. मात्र शाळेसमोर गतिरोधक नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परिणामी आता  रस्त्यावरील शाळेसमोर गतिरोधक देण्याची मागणी जोर धरत आहे. अशीच मागणी गणेश वॉर्ड येथील जिल्हा परिषद उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा क्रमांक १ येथील शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि शिक्षक वर्गानी केलेली आहे. साकोली तालुक्यातील सर्वाधिक जुनी जनपद म्हणजे आजची जिल्हा परिषद उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा क्रमांक १. सध्या या शाळेने तालुक्यात पुनश्च फिनिक्स भरारी घेऊन शाळेचे स्वरूप पालटले आहे. त्यामुळे या शाळेत दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. आजतागत या शाळेत १ ते ७ वर्गापर्यंतची विद्यार्थी-विद्यार्थिनीची संख्या जवळपास २७५ पर्यंत पोहोचली आहे. कधीकाळी म्हणजे ५-६ वर्षांपूर्वी या शाळेची संख्या ८० होती यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र हा  शालेय चमत्कार ज्यांच्या नेतृत्वात झाला ते शाळेचे मुख्याध्यापक दूलीचंद वलथरे आणि ज्यांचे सहकार्य आणि अथक परिश्रम लाभले ते सहकारी शिक्षक वृंद मोरेश्वर बोकडे, तुळशीदास पटले, शालिनी राऊत, बलवीर राऊत, चेतन बोरकर, चित्ररेखा इंगळे यांच्यामुळे. या शाळेसमोरून जाणारा रस्ता हा सरळ राष्ट्रीय महामार्गाकडे जातो. शाळेच्या परिसरात व्यावसायिक दुकाने असल्याने वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. काही युवक स्वतःला सुपरस्टार हिरो समजून शाळेसमोरून दुचाकी वाहने सुसाट चालवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा रस्त्याला लागून असल्याने मधल्या सुट्टीत अथवा शाळेत अवागमन दरम्यान विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका संभवतो. सदर शाळेसमोर गतिरोध देण्याची मागणी गत मागील वर्षापासून आहे. मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले. आता मात्र पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने कठोर निर्णय घेतला असून गतिरोधक येत्या सोमवार पर्यंत बसवून देण्याची मागणी केली आहे. सदर शाळा जिल्हा परिषद भंडारा यांच्या अखत्यारीत येत असली तरी हा रस्ता नगरपरिषद शिवेत येतो. नगरपरिषद प्रशासनाने या बाबींची गंभीर  दखल घेऊन शाळे समोरील दोन्ही बाजूला येत्या सोमवार पर्यंत गतिरोध बसवून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांनाच नगर परिषदेच्या कार्यालयात बसवल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा गर्भित इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष रीना चचाने, माजी नगरसेवक तथा शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य हेमंत भारद्वाज, अरविंद राऊत, मोहित टेंभुकर,आदित्य जांभुळकर, रवी वलथरे, जयपाल संयाम, सदस्य तथा सोशल मीडिया प्रमुख आशिष चेडगे, शाळा समितीचे सदस्य तथा पत्रकार रवि भोंगाने यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या