Ticker

6/recent/ticker-posts

समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला न्याय देण्याचे काम शासन करीत आहे- आमदार दादाराव केचे


निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपुर्णता अभियानाचे उद्घाटन

संघदीप मेश्राम चित्रा न्युज 
वर्धा: समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींना न्याय देण्याचे काम शासन करीत असून शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, युवाशक्ती, महिलाच्या हाताला काम देऊन विकासाच्या प्रवाहात आनण्याचे शासनाचे धोरण आहे.  यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आमदार दादाराव केचे यांनी आज संपूर्णता अभियान कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलतांना केले. 
आज कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायत काजळी येथील रुद्र मंगलकार्यालय येथे निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, आर्वी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, केंद्र शासनाचे निती आयोगाचे प्रतिनिधी आश्विनकुमार वासनिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज.पराडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरीता गाखरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिवृध्द राजुरवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, तहसिलदार एश्वर्या गिरी, गट विकास अधिकारी प्रविण देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती जगदिश डोळे,  जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चेतन शिरभाते,अपुर्व फिरके आदी मान्यवर उपस्थित होते. 
केंद्र शासन विकसित भारताची संकल्पना ठेऊन काम करीत असून देशातील प्रत्येक गाव, तालुका, शहर समृध्द झाले पाहिजे  केंद्र शासनाने आकांक्षित तालुका कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली. या अभियानांतर्गत  कारंजा तालुक्यातील विकासात्मक कार्यक्रमासोबतच नागरिकांना आरोग्य सुविधा, शिक्षण, कृषि, गरोदर मातांना पोषण आहार इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहे. या सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे  आमदार दादाराव केचे म्हणाले. 
सध्याच्या काळात माणसाची जिवनशैली बदलली असून त्यामुळे विविध आजारांना मनुष्याला सामोरे जावे लागत आहे. जगातील 66 टक्के मृत्यु उच्च रक्तदाब, मधुमेह या सारख्या आजारामुळे   होत आहे. यासाठी संपूर्ण अभियानांतर्गत 40 प्रकारच्या मुद्द्यांवर काम करण्यात येत असून आरोग्य, कृषि, शिक्षण, पोषण आहार यावर भर देण्यात येत आहे. 
शेतक-यांनी पारंपारिक पिक पध्दतीत बदल करुन माती परिक्षण करुन नवीन पिक उत्पादन घ्यावे. त्याचबरोबर रेशीम शेती शेती उद्योगाकडे वळावे, बालविवाह प्रथा थांबविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. तालुक्यात 300 वनाराई बंधारे बांधन्यात आले असल्याचे सांगून  आकांक्षित असलेल्या कारंजा तालुक्याला प्रेरणादाई  व मॉडेल बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. राहुल कर्डिले यांनी केले. 
संपुर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुती पुर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार, माती परीक्षण आणि बचतगटांना मिळणारा फिरता निधी, शाळेतील विद्यार्थ्यांचा सोई सुविधा आहे. या सुविधांचा तालुक्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जितीन रहेमान यांनी केले.
यावेळी सरीता गाखरे, अनिवृध्द राजुरवार, विश्वास सिरसाट यांनी सुध्दा आपले मनोगत मांडले. 
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचे हस्ते गरोदर मातांना पोषण किटचे वितरण करण्यात आले. तसेच अभियानांच्या जनजागृतीकरीता  शाळेतील विद्यार्थ्यांकरीता आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले.  
कार्यक्रमाच्या संपूर्णता अभियानाच्या जनजागृती प्रभातफेरीचे काजळी ग्राम पंचायत येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थित आयोजन करण्यात आले. ही प्रभातफेरी गावामध्ये मार्गक्रमण करुन कार्यक्रमस्थळी समारोप करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होती. 
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्णता अभियानातील दर्शकांची संपूर्णता करण्यासाठी योगदान देण्याचे आणि आकांक्षित तालुक्याला आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध बनविण्याची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला आशा, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कर्मचारी, एएनएम  शेतकरी, गावकरी व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या