राकेश आसोले चित्रा न्युज
सोलापूर : शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी आपली बाजू मांडत, हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मनीष काळजे यांनी स्पष्ट केले की, संबंधित कॉन्ट्रॅक्टर आकाश कानडे हा ब्लॅकलिस्टेड आहे आणि पूर्वी त्याच्याशी कधीही संपर्क झाला नव्हता. "दोन दिवसांपूर्वी तो माझ्या कार्यालयात आला होता. येण्यापूर्वी त्याने मला फोनही केला होता, ज्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे," असे काळजे म्हणाले.
आकाश कानडेने शासनाकडून मिळालेल्या निधीचे काम त्याला मिळावे अशी मागणी केली होती. काळजे यांनी स्पष्ट केले की, "टेंडर प्रक्रिया ओपन आहे आणि जे क्वालिफाईड होतील तेच काम मिळवतील. यात माझा कोणताही रोल नाही." त्यांनी अधिक स्पष्ट केले की, "काम उत्कृष्ट दर्जाचे झाले पाहिजे असे सांगितले होते."
दुसऱ्या दिवशी, महानगरपालिकेत कामानिमित्त गेल्यानंतर आकाश कानडे संबंधित अधिकाऱ्याशी वाद घालत होता. "तो अधिकाऱ्यांना धमकावत होता की माझी कंपनी क्वालिफाईड करा अन्यथा माझे साहेब अधिकारी डेंगळे पाटील यांना सांगून तुमच्यावर कारवाई करतील," असे काळजे म्हणाले.
यानंतर, मला समजले की तो माझ्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे. डीसीपी कबाडे साहेब आणि पीआय लकडे साहेब यांना संपर्क साधून मी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. माझ्या कार्यालयातील फुटेज, जे ऑडिओ-व्हिडिओसह आहेत, हे पोलिसांना सुपूर्द केले. यात कुठेही मी त्याला मारहाण किंवा पैशाची मागणी केली असे दिसत नाही. मात्र, डीसीपी कबाडे यांच्या दबावामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"गेल्या तीन महिन्यांत माझ्यावर तीन गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यात कसलेही एव्हिडन्स नसताना मला दोषी ठरवले आहे. डीसीपी कबाडे यांनी वारंवार माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून माझं राजकीय करियर संपवण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बाजूने यंत्रणा वापरली आणि माझ्यावर गुन्हे दाखल केले," असे काळजे यांनी सांगितले.
"माझ्या न्यायासाठी, मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार करणार आहे आणि डीसीपी कबाडे यांची चौकशी होऊन त्यांना निलंबित करण्यात यावे अशी विनंती आहे," असे काळजे म्हणाले.
काळजे यांनी सांगितले की, "या संदर्भातील सर्व कॉल डिटेल्स, रेकॉर्डिंग्स, व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज आणि निवडणूक आयोगाला दिलेले पत्र माझ्याकडे उपलब्ध आहेत."


0 टिप्पण्या