चित्रा न्युज ब्युरो
नवी दिल्ली : भारत सरकारने एकूण 156 वेगवेगळी औषधं बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता ताप, अंगदुखी, डोकेदुखी यासारख्या वेदनेवर घेतली जाणारी अनेक औषधं आता मिळणार नाहीत. विशेष म्हणजे सरकारने या औषधांवर तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. बंद करण्यात आलेल्या औषधांची निर्मिती, विक्री, वाहतूक करण्यावरही बंदी असेल. या 156 औषधांवर संपूर्ण देशात बंदी घालण्यात आली आहे.
कोणकोणत्या औषधांवर बंदी असणार
सरकारने बंदी घातलेल्या औषधांमध्ये ताप, अंगदुखी अशा सामान्य आजारांसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचाही समावेश आहे. जसे की, एसिक्लोफेनॉक 50एमजी + पॅरासिटामोल 125एमजी प्रमाण असणारे औषध आता विकता येणार नाही. यासह मेफेनॅमिक अॅसिड + पॅरासिटामोल इंजेक्शन, सिट्राझीन एचसीएल + पॅरासिटामोल + फेनिलफ्रीन एचसीएल, लेवोसेट्रीजीन + फेनाइलफ्रीन एचसीएल + पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरॅमाइन मॅलेट + फेनाईल प्रोपेनॉलामाइन तसेच कॅमिलोफिन डाइहायड्रोक्लोराईड 25एमजी + पॅरासिटामोल 300एमजी घटक असणाऱ्या औषधांच्या गोळ्या निर्माण, विक्री करण्यावर बंदी आणण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी शरीराला हानीकराक ठरणाऱ्या औषधांवर बंदी घातली जाते. कोणतीही चाचणी न करता एखाद्या औषधाची निर्मिती केलेली असेल किंवा योग्य प्रक्रिया पाळलेली नसेल तर अशा औषधांवर लगेच बंदी घातली जाते. एका तज्ज्ञ समितीकडून तसेच सल्लागार मंडळाकडून मिळालेल्या सूचनेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वरील निर्णय घेतला आहे. याआधी सरकारने मार्च 2016 मध्ये वेगवेगळे संयोजन असलेल्या 344 औषधांवर तसेच जून 2023 मध्ये 14 औषधांवर बंदी घातली होती.


0 टिप्पण्या