• तहसील कार्यालय भंडारा चे पुरवठा विभागातील प्रकार
• हेच धान्य काळ्या बाजारात
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक तथा प्रभारी निरीक्षण अधिकारी सत्यवान बांते यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे तसेच सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांवरील नियंत्रण संपुष्टात आल्याने राशन कर्डावरील लोकसंख्या तसेच पास मशीन द्वारा धान्य वितरणात तफावत येत असून जुलै २०२४ मध्ये अंतोदय व प्राधान्यक्रम गहू ६३८.५४ क्विंटल तर तांदूळ २ हजार १८१.८५ क्विंटल तसेच साखर २४.८९ क्विंटल तफावत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते व हेच धान्य संगनमताने काळ्या बाजारात विक्री होत असल्याच्या शहरात चर्चा होत असल्यामुळे सत्यता पडताळणी करून पुरवठा निरीक्षक सत्यवान बांते यांचेवर कारवाई करणे आवश्यक झाले आहे.
ग्रामीण व शहरी भागात वास्तव्यास असलेल्या दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, परितक्त्या व अनुसूचित जमाती चे कुटुंबास महसूल विभागाचे अखत्यारीत असलेल्या पुरवठा विभागामार्फत सार्वजनिक वितरण प्रणालीचे माध्यमातून सरकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्य पुरवठा केला जातो. अंतोदय शिधापत्रिका धारकास ३५ किलो ग्रॅम प्रति महिना त्यात २५ किलो ग्रॅम तांदूळ व १० किलो ग्रॅम गहू तर प्राधान्यक्रम शिधापत्रिका धारकास प्रति व्यक्ती ५ किलो ग्रॅम या प्रमाणे धान्य वितरण केले जाते. त्यात ४ किलो तांदूळ व १ किलो ग्रॅम गहू चा समावेश आहे. कार्ड धारकांना योग्य रीतीने धान्य पुरवठा होतो किंवा नाही. हे पाहण्याची जबाबदारी पुरवठा निरीक्षकाची आहे. भंडारा तालुक्यात १७४ सरकारी स्वस्त धान्य दुकान असून अंतोदय कार्ड धारक संख्या ११ हजार ६९८, विस्तारित अंतोदय(प्राधान्यक्रम) कार्ड धारक संख्या ४० हजार ६९५ लोकसंख्या १ लाख ६२ हजार ७५४ तथा एपीएल कार्ड धारक संख्या ४ हजार ९४४ असून एकूण कार्ड धारक संख्या ५७ हजार ३३७ तर लोकसंख्या २ लाख १९ हजार २४८ आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानावर सनियंत्रण व देखरेखीचे काम तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षक सत्यावांत बांते यांचेकडे आहे.
माहे जुलै २०२४ मध्ये अंतोदय कार्ड संख्या ११ हजार ६९८ ला १ हजार १६९.८० क्विंटल तसेच प्राधान्यक्रम १ लाख ६३ हजार ७५४ लोकसंख्येला १ हजार ६२७.५४ क्विंटल गहू असा एकूण २ हजार ७९७.३४ क्विंटल गहू तथा अंतोदय २ हजार ९२४.५० क्विंटल तांदूळ तसेच प्राधान्यक्रम लोकसंख्येला ६ हजार ५१०.१६ क्विंटल असा एकूण ९ हजार ४३४.६६ क्विंटल तांदूळ पुरवठा विभागामार्फत उपलब्ध करण्यात आला. पास मशीन नुसार अंतोदय ९ हजार २०९ कार्ड धारकांना ९२०.९० क्विंटल गहू तसेच प्राधान्यक्रम लोकसंख्येला १ हजार २३७.९० क्विंटल असा एकूण २ हजार १५८.८० क्विंटल गहू तसेच अंतोदय २ हजार ३०२.२५ क्विंटल तर प्राधान्यक्रम लोकसंख्येस ४ हजार ९५०.५६ तांदूळ असा एकूण ७ हजार २५२.८१ क्विंटल तांदूळ वितरित करण्यात आला आहे. तसेच अंतोदय ११ हजार ६९८ कार्ड धारकांना ११६.९८ क्विंटल साखर उपलब्ध करण्यात आली. पास मशीननुसार ९ हजार २०९ कार्ड धारकांना ९२.०९ क्विंटल साखर वाटप करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यावरून गहू पुरवठा व वाटपात ६३८.५४ क्विंटल, तांदूळ २ हजार १८१.८५ क्विंटल तर साखर २४.८९ क्विंटल तफावत असल्याचे दिसून येते. अंतोदय कार्ड धारक संख्या ११ हजार ६९८ तर मास मशीन मध्ये ९ हजार २०९ दिसून येत असल्यामुळे २ हजार ४८९ कार्ड गेले कुठे असा संभ्रम निर्माण होतो. सध्या शासनाकडून कार्ड धारकांना मोफत धान्य पुरवठा होत असल्यामुळे एवढे कार्ड धारक सरकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करीत नाही म्हणणे हास्यास्पद दिसते. पुरवठा निरीक्षक तथा प्रभारी निरीक्षण अधिकारी यांनी हा विषय गंभीरतेने घेतला असता तर ही तफावत त्यांचे निदर्शनास आली असती. की आर्थिक लाभासाठी या गंभीर बाबीकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष करण्यात येतो. हा चिंतनाचा विषय झाला आहे. हेच धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जाते म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. या प्रकाराने पुरवठा निरीक्षक यांचे कार्यप्रणालीची चौकशी करून कारवाई होणे आवश्यक झाले आहे.
0 टिप्पण्या