ग्रामीण भागातून गुन्हेगारी जगतात गेलेला डॉन
रवी भोंगाने साकोली
साकोली:-सन १९६२ मध्ये एक प्रख्यात नाटक निर्मितीस आले. मराठी रंगभूमीवर इतिहास घडणारे ते नाटक म्हणजे, " तो मी नव्हेच " प्रल्हाद केशव अत्रे लिखित हे नाटक लखोबा लोखंडेच्या पात्रात एका बदमाशाची भूमिका साकारणारे हे नाटक आहे. या नाटकात अनेक कलाकारांनी भूमिका बजावली. या कलाकारांनी आज प्रत्यक्षात असलेल्या लखोबा लोखंडे रूपातील विलास गणवर त्याची जिवंत भूमिका बघितली असती तर त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले असते. एवढे अस्सल पात्र खऱ्या जीवनात आणि गुन्हेगारी जगतात विलास गणवीर याने साकारले. प्रल्हाद केशव अत्रे यांचे हे अजरामर नाटक. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले. या नाटकात लखोबा लोखंडे नावाचे एक पात्र असते. तो स्वतःचे अनेक रूप बदलून लोकांना गंडा घालत असतो. आणि सापळ्यात अडकल्यानंतर न्यायालयीन कठड्यात जेव्हा येतो "तो मी नव्हेच " हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. अशाप्रकारे अनेक भूमिका साकारून राज्यात अनेक लोकांना गंडा घालणारा लखोबा लोखंडे रूपातील विलास नारायण गणवीर पुन्हा एकदा पोलिसांच्या सापड्यात अडकला. ग्रामीण भागातून गेलेला आणि शहरी भागात विसावलेला गुन्हेगारी जगतातील हा ४२० डॉन. साकोली तालुक्यातील किन्ही ( मोखे )
हे त्याचे मूळ गाव. विलास नारायण गणवीर (वय ६५) या आरोपीचे नाव. जेवढे या आरोपीचे वय आहे त्यापेक्षा दुप्पट गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात असे एकही पोलीस स्टेशन नाही की जिथे लखोबा लोखंडे रूपातील विलास गणवीर यांच्या कारणाम्याचे विविध कलमाखाली गुन्हे दाखल नाहीत. कधी पोलीस अधिकारी, कधी डॉक्टर, कधी वकील, कधी कस्टम ऑफिसर, कधी तहसीलदार, कधी रेल्वेतील टी.सी, कधी वाहतूक पोलीस, कधी तलाठी, कधी ग्रामसेवक तर कधी खासदाराचा पी.ए. तर कधी आमदाराचा पी.ए. शासन स्तरावर जेवढी वरिष्ठ पदे आहेत. त्या सर्व पदांची आरोपी भूमिका प्रत्यक्षात उतरवली आहे नव्हे तो भूमिका साकारूनच जगला आहे. या पात्रातून फसगत करून नोकरी लावून देणे हे त्याच्या गुन्ह्याचे प्रमुख स्वरूप. हा त्याचा प्रमुख व्यवसाय.रंगभूमीवर तो मी नव्हेच या नाटकात ज्या कलावंतांनी लखोबा लोखंडे या पात्राची भूमिका साकारली त्यांनी विलास गणविर याकडे बघितले असते तर नक्कीच आश्चर्य व्यक्त केले असते. कारण रंगभूमीवर साकारलेले नाटक आणि प्रत्यक्षात जीवनात जगलेले नाटक यांची गंभीर भूमिका त्यांना समजली असती. संपूर्ण आयुष्य गुन्हेगारी जगतात घालवणारा विलास गणवीर हा सध्या डुगीपार पोलीस स्टेशनच्या आत आहे. ग्रामीण भागातून गेलेला आणि गुन्हेगारी जगतात डॉन बनलेला विलास गणवीर मूळचा साकोली तालुक्यातील किन्ही ( मोखे ) गावचा. डुग्गीपार(सडक/अर्जुनी) पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की,मौजा खोडशिवनी रेल्वे स्टेशन परीसरात एक व्यक्ती औरंगाबांद पोलीस दलात पोलीस शिपाई या पदाकरीता नोकरीचे आमिष देवुन फसवणुक करणारा गुन्हेगार आरोपी विलास नारायण गणवीर वय ६५ वर्षे रा. किन्ही/मोखे, ता. साकोली हा संशयीत रित्या कागदपत्रासह आढळुन आल्याने त्याला डूग्गीपार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा गणवेश, बनावट नेमप्लेट, पोलीस अधीकाऱ्याचे बनावट ओळखपत्र, औरंगाबाद पोलीस भरती उमेदवार प्रवेशपत्र, मुख्य वैद्यकीय अधिकारी औरगांबाद, पोलीस अधीक्षक औरंगाबाद यांचे शिक्का असलेले कागदपत्रे, विद्यार्थ्याचे शालेय मुळ कागदपत्रे टि.सी. मार्कशिट, डोमेशीयल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जात वैद्यता प्रमाणपत्र आढळले. आरोपीविरुध्द विविध जिल्हयातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती गोंदिया पोलिसांनी दिली आहे. फिर्यादीचे तक्रारीवरुन आरोपी विलास नारायण गणवीर रा. किन्ही/मोखे यांचे विरुध्द पोलीस ठाणे डुग्गीपार येथे अपराध क्रमांक २७७/२०२४ कलम २०४, २०५, ३१९(२), ३१८(४), ६२, ३३६(३) भा.न्या.स २०२३ अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिपक खोटेले करीत आहेत.


0 टिप्पण्या