Ticker

6/recent/ticker-posts

पाणी व स्वच्छता समिती गावागावात रुजवणार जलसाक्षर चळवळ

भुसावळ तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या पाणी समितीचे प्रशिक्षण

पंकज पाटील विभागिय संपादक नाशिक

भुसावळः पाणी हा घटक सर्व समाज जीवनावर परिणाम असतो. अति खोलावर जाऊन पाण्याचा अतिरेकी उपसा वाढल्याने पाण्याची गुणवत्ता बाधित होवून मागणी व पुरवठा यावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत गाव पातळीवरील नागरिकांना नियमित पाणी मिळण्यासाठी व पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा म्हणून जलजीवन मिशन मिशन अंतर्गत भुसावळ तालुक्यातील ३७ ग्रामपंचायत अंतर्गत पाणी व स्वच्छता समितींना पायाभूत प्रशिक्षण देण्यात आले. हि समिती आता गाव पातळीवर जलसाक्षर चळवळ रूजवणार आहे.जिल्हा परिषद जळगाव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, भुसावळ पंचायत समिती व केआरसी राष्ट्रविकास संस्था अमळनेर यांच्या विद्यमाने हे प्रशिक्षण पंचायत समिती सभागृहात नुकतेच घेण्यात आले. या प्रशिक्षणात सदस्यांना जलश्रोत बळकटीकरण, पाणीपट्टी वसुली, जल अंदाजपत्रक, पेजल संहिता, जलसाक्षरता, देखभाल दुरुस्ती, पाणी समितीची जबाबदारी यावर यशदा प्रशिक्षक अशोक पाटील, नितीन नेरकर, अमोल बैसाणे व बीआरसी स्वप्नील आगीवाल यांनी प्रशिक्षण दिले. पीपीटी, खेळ, गटचर्चा, यशोगाथा आदींचा या प्रशिक्षणात समावेश होता. प्रकल्प संचालक (पावस्व) डॉ. सचिन पानझडे, राष्ट्रविकास संस्थेचे भूपेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनात हे प्रशिक्षण घेण्यात आले.
              प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट
जलजीवन मिशन अंतर्गत प्रतिव्यक्ती ५५ लिटर नियमित व पुरेसे पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाण्याचा अति वापर कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. काटकसर व नियोजनबद्ध रित्या पाण्याचा टंचाई काळातही सुयोग्य वापर व्हावा यासाठी पाणी समितीचे बळकटीकरण करण्यात येत आहे. समिती आता देखभाल दुरुस्तीसह नियमित पाणीपुरवठ्याची जबाबदारी पार पाडेल. समितीचे अध्यक्ष सरपंच, उपाध्यक्ष उपसरपंच, सचिव आशा वर्कर, महिला सदस्य, जलसुरक्षक यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या