Ticker

6/recent/ticker-posts

मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत मिशन इंद्रधनुष्य राबवावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

चित्रा न्युज ब्युरो
  सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत मिशन इंद्रधनुष्य राबवून सर्व स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमांव्दारे जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकार डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीप कार्यक्रम आढावा व नियोजनाबाबत स्वीप समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रमाव्दारे जनजागृती करावी. त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात याव्यात. महिला बचत गट, सहकारी संस्था, साखर कारखाने, महाविद्यालये, शाळा, ईप्रतिज्ञा आणि मतदार चिठ्ठी वाटप अशा सात घटकांवर भर देऊन मिशन इंद्रधनुष्य राबवावे. उमदे आणि माविमचे महिला बचत गट यांची मतदानपूर्वी दोनदा बैठक घ्यावी. सहकार विभागांतर्गत संस्थांचीही बैठक घेऊन मतदार जनजागृती करावी, आवाहनपत्राचे वाचन करावे, असे त्यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मतदान केंद्र, गाव व तालुका स्तरावर महाविद्यालय, पेट्रोल पंप, एसटी महामंडळ बसस्थानक, बसेस, पोस्ट कार्यालये, चावडी आदि ठिकाणी पोस्टर, स्टीकर, ऑडिओ  जिंगल्स, नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करावी. दिवाळी सुटीनंतर शाळांमध्ये शिक्षक पालक बैठका आयोजित कराव्यात. शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घ्यावे. साखर कारखान्यांमध्ये बॉयलर अग्निप्रदीपनवेळी जनजागृती करावी. मतदारचिठ्ठीचे 100 टक्के वाटप करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
 स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे म्हणाले, तालुकास्तरावर मोठी रांगोळी, ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते, त्या ठिकाणी पोहोचून मतदार जनजागृती करावी. त्याचबरोबर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी रांगोळी स्पर्धा, सायकल रॅलीचे नेटके आयोजन करून मतदार जनजागृती  मोठ्या प्रमाणावर करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळीस तालुकास्तरीय नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ई मतदार प्रतिज्ञेचे उद्‌घाटन करण्यात आले.
मतदार जागृतीसाठी सायकल रॅली
जिल्हा स्वीप कक्षामार्फत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी विश्रामबाग चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली या मार्गावर काढण्यात आलेल्या सायकल रॅलीस उदंड प्रतिसाद  मिळाला. या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे यांनी स्वत: सहभाग घेवून मतदार जनजागृतीसाठी आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये येत्या 20 नोव्हेंबर रोजी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर मतदारयादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करण्याचे आवाहनही केले.
 या रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन, एमआयटी, स्पंदन ग्रुप, बीएनआय सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग, सांगली सायक्लोथॉन, कृष्णा बोट क्लब, एस ३ ॲकेडमी, एईसी क्लब सांगली, विविध कॉलेजचे विद्यार्थी, महापालिका अधिकारी, कर्मचारी आदींनी सहभाग घेतला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या