• विहीरगाव/कन्हाळ्या रेती घाटावरील प्रकार
• पालांदूर पोलिसांसह एसडीपीओ पथक निष्प्रभ
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे हातात घेताच जिल्ह्यातून अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न सुरू केले. त्या करिता जिल्ह्यातील प्रत्येक ठाणेदाराला आवश्यक त्या सूचना तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात विशेष पथकाची नियुक्ती केली. पण चुलबंद नदीपात्रातील भूगाव-विहीरगाव/कन्हाळ्या रेती घाटातून रात्री १०:०० ते सकाळी ७:०० वाजे पर्यंत न्याहारवानी च्या एका कुख्यात रेती तस्कराचे नेतृत्वात पळसगाव व पहाडी येथील सहकाऱ्यांच्या विना क्रमांकाच्या ४ ते ५ ट्रॅक्टर ट्रॉली द्वारा मागील महिनाभरापासून रेती तस्करी सुरू आहे. या बाबद स्थानिक पोलीसांसह उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ही बाब माहिती असताना सुद्धा विहीरगाव/कन्हाळ्या रेती घाट व परिसरात अजून पर्यंत कारवाई केली गेली नसल्यामुळे रेती तस्करी थांबविण्यास पोलिस यंत्रणा कुचकामी ठरल्यानुसार तालुक्यात चर्चा होत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता सर्वच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात विशेष पथक तयार करून अवैध दारू विक्री, रेती तस्करी, अवैध सट्टा, चोऱ्या, गोतस्करी रोकथाम करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी काही स्वार्थी प्रवृत्तीच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून यास बगल देऊन अवैध रेती माफियांशी संधान साधून चुलबंद नदी पात्रातील भूगाव-विहीरगाव/कन्हाळ्या रेतीघाटातून रात्रीचे सुमारास रेती उपसा व वाहतूक बंद असताना न्याहारवानी येथील एका कुख्यात रेती माफियाचे २, पहाडी व पळसगाव येथील रेती तस्करांचे प्रत्येकी १ अशा एकूण विना क्रमांकाच्या ४ ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारा अवैध रेती उपसा व वाहतूक बिनबोभाट सुरू आहे. भूगाव येथील काही गावकऱ्यांनी अवैध रेती तस्करीवर प्रतिबंध लावण्याचे प्रयत्न केले. पण रेती तस्करांकडून धमक्यामुळे त्यांना नाईलाजाने दुर्लक्ष करावे लागले.
लाखनी तालुक्यातून प्रवाहित होणाऱ्या चुलबंद नदी पात्रातील रेतीघाटात पांढरी शुभ्र व बारीक अशी उच्च प्रतीची रेती असल्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही प्रचंड प्रमाणात मागणी होत आहे. पण रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे रेती तस्करांचा उदय झाला. पळसगाव व वाकल येथे शासनाकडून रेती डेपो तयार केल्या गेल्या असल्या तरी या रेती डेपोत रेतीसाठा असताना सुद्धा विक्री बंद असल्यामुळे रेती माफियांच्या फावते. अशा चुलबंद नदीखोऱ्यात चर्चा होत आहेत. मिरेगाव वगळता सर्व रेती घाट पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरिक्षकासह स्थानिक बीट अंमलदार व सहाय्यकाला रेती तस्करांबाबद सर्व माहिती आहे. पण वरची अतिरिक्त कमाई बंद होण्याचे भीतीपोटी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हेतू पुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध व्यवसायाचे उच्चाटनाचा उचललेला विडा सफल होईल का ? हा चिंतनाचा विषय झाला आहे.
भूगाव-विहीरगाव/कन्हाळ्या रेतीघाटातून अवैध उपसा झालेली व ट्रॅक्टर ट्रॉली व्दारे केली जात असलेली रेती तस्करी पालांदूर व लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सीमावर्ती गावात विक्री केली जाते. या गावात अनेक तलाठी कार्यालये, जवळपास प्रत्येक गावात पोलिस पाटील व मुखबिरांचे जाळे पसरले असताना पालांदूर पोलिसांना या रेती तस्करीची माहिती कशी नाही ? किंवा माहिती असून सुद्धा या गंभीर बाबीकडे हेतू पुरस्पर कानाडोळा केला जातो. हे कळण्यास मार्ग नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरील हसन यांनी पालांदूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचेसह चुलबंद नदी खोऱ्यातील बीट अंमलदाराच्या कार्यप्रणालीची चौकशी करून कारवाई करावी. तसेच चुलबंद नदी खोऱ्यातील भूगाव-विहीरगाव/कन्हाळ्या रेती घाटातून होणारी रेती तस्करी बंद करणे आवश्यक झाले आहे.


0 टिप्पण्या