• शेतकरी चिंतातुर, वन विभागाकडून उपाययोजना नाही
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- हलक्या प्रजातीचे धान परिपक्व होण्याचे मार्गावर आहे, मध्यम प्रजातीचे धान निसवा होण्याचे अवस्थेत असून उच्च जातीचे धान गर्भार अवस्थेत आहे. पण वन क्षेत्रालगत असलेल्या शेतजमिनीत वन्य प्राणी व वन्य प्राण्यांचे झुंड शिरून धान पिकाची नासाडी करीत असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असला तरी वन विभागाकडून कसलीही उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे धान उत्पादकाचे चिंतेत भर पडली आहे.
तालुक्यात मध्यम वा मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे सिंचन विहीर, मामा तलावाचे साहाय्याने ओलिताची सोय असणारे शेतकरी ११० ते १४० दिवसात निघणाऱ्या धानाच्या वानाची लागवड करतात. तर कोरडवाहू शेतकरी ९० ते ११० दिवसांत निघणाऱ्या हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड करतात. तालुक्यात लाखनी, माडगी, जांभळी, किटाडी इत्यादी ठिकाणी वनपरीक्षेत्र कार्यालय असून वन क्षेत्रालगत हजारो शेतकऱ्याचे शेतजमिनी आहेत. या वनक्षेत्रात हरीण, रानडुक्कर, सांबर, घोडेनील यासारख्या वन्य प्राण्यांचा वावर असून सायंकाळचे सुमारास हे तृणभक्षी प्राणी शेतात शिरून धान पिकाची नासाडी करतात.
चालू खरीप हंगामात मृग नक्षत्राचे शेवटी व आद्रा नक्षत्राचे सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे वेळेतच पेरणी आणि त्यानंतर मुदतीत रोवणीही करण्यात आल्यामुळे सध्या हलके धान निसावा होण्याचे मार्गावर तर , मध्यम प्रतीचे धान गर्भार अवस्थेत आहेत. पण वन्य प्राणी व कळपांचा शेतात शिरकाव होत असल्यामुळे हाती आलेले पीक तृणभक्षी प्राण्यामुळे हातचे जाणार त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला असला तरी यावर वन विभागाने कसलीही उपाययोजना केली नाही किंवा शेतकऱ्याला उपाययोजने संदर्भात मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे धान उत्पादकांची चिंता वाढली आहे.
प्रतिक्रिया
वन क्षेत्रालगत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी शेतातील धान पिकाचे नुकसान होऊ नये. या करिता शेतात जुन्या पांढऱ्या रंगाच्या कापडाचे बुजगावणे लावल्यास तृणभक्षी प्राणी भिऊन शेताकडे फिरकणार नाही. पर्यायाने धान पिकाचे संरक्षण होईल. करिता शेतकऱ्यांनी बुजगावन्याचा शेतात प्रयोग करावा.
मुकेश श्यामकुवर, क्षेत्र सहाय्यक किटाडी


0 टिप्पण्या