• रस्ता दुरुस्तीकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत पिंपळगाव/सडक ते धाबेटेकडी अंदाजे अंतर ५ किमी या रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले असून काम पूर्णत्वानंतर ५ वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम कंत्राटदार एन.एन. पुगलिया यांचेकडे आहे. या रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडले असून डांबरही उकळलेल्या स्थितीत असले तरी दुरुस्तीकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असल्याने हा रस्ता अपघाताला निमंत्रण देतो आहे. म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पिंपळगाव/सडक ते धाबेटेकडी ह्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे आवागमन करणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. रस्त्यावरील खड्डे चुकवितांना दुचाकी चालकाचे संतुलन बिघडून अनेक अपघात झाले होते. गावकऱ्यांचे मागणी वरून आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पिंपळगाव/सडक ते धाबेटेकडी रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण व रुंदीकरणाचे काम मंजूर करण्यात आले. ई-निविदेची अंदाजपत्रकिय रक्कम १ कोटी ८८ लाख १६ हजार रुपये तर बांधकामाचे कंत्राट एन.एन. पुगलिया नागपूर यांना देण्यात आले होते. यावर तांत्रिक मार्गदर्शन देखरेख व सनियंत्रणाचे काम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा चे कनिष्ठ अभियंता शैलेश हरकंडे यांचेकडे सोपविण्यात आले होते. फेब्रुवारी २०२० मध्ये बांधकाम पूर्ण करण्यात आले. तर या रस्त्याची फेब्रुवारी २०२५ पर्यंत दुरुस्तीचे काम सदर कंत्राटदाराकडे आहे.
या रस्त्यावरून रेती तस्करांकडून रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. या शिवाय शॉर्ट कट असल्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत व डांबर उखळण्याचे स्थितीत असल्यामुळे आवागमन करणाऱ्यांना अकारण त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असते. या खड्ड्यातून वाहन गेल्यास पायदळ, सायकल किंवा दुचाकीने जाणाऱ्यांचे पाणी उडून कपडे खराब झालेले आहेत. या प्रकाराने अनेक विद्यार्थ्यांची शाळाही बुडालेली आहे. पण कंत्राटदार एन.एन. पुगलिया यांचे दुरुस्तीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पिंपळगाव ते धाबेटेकडी रस्ता अपघातास निमंत्रण देऊन भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीकडे लोक प्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी हा रस्ता दुरुस्त होणे आवश्यक आहे.
0 टिप्पण्या