Ticker

6/recent/ticker-posts

अबब... लोकसेवेच्या पंचसूत्रीवर बाबासाहेबांचे छायाचित्र !

• काँग्रेस चा दुटप्पीपणा उघड

• बौद्धांनी सावध होण्याची गरज

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
 भंडारा :- महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेस च्या एका नेत्याने काँग्रेस गांधी नेहरूंच्या विचारावर चालणारा पक्ष असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाची काँग्रेस ला गरज नसल्याचे धक्कादायक विधान केले. त्याच काँग्रेस ने राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदारांना आश्वस्थ करण्यासाठी लोकसेवेची पंचसूत्री तयार करून ५ गॅरंटी दिल्या आहेत. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून या प्रकाराने काँग्रेस चा दुटप्पीपणा उघड झाला असून सदर घटनाक्रम लक्षात घेता बौद्ध समाजाने सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. 
                      १४व्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत असल्याने निर्वाचन आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्याने सध्या सर्वच राजकीय व प्रादेशिक पक्षासह अपक्ष उमेदवारांनीही प्रचारात मुसंडी मारली आहे. त्यातच महाविकास आघाडीचा लोकसेवेची पंचसूत्री या शीर्षकाखाली मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महालक्ष्मी, कुटुंबरक्षण, समानतेची हमी, कृषी समृद्धी, युवकांना शब्द अशा ५ गॅरंटी दिलेल्या आहेत. यावर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या कोणत्याही नेत्याचे छायाचित्र नाही. पण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचेसह भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्रासह महाविकास आघाडीतील घटकपक्षाचे बोधचिन्ह दर्शवण्यात आलेले असून महालक्ष्मी गॅरंटी अंतर्गत महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये आणि महिला व मुलींसाठी मोफत बसप्रवास. कुटुंबरक्षण अंतर्गत २५ लाखापर्यंतचा आरोग्यविमा व मोफत औषधे. समानतेची हमी नुसार जातीनिहाय जनगणना करणार तसेच ५० टक्के आरक्षण मर्यादा हटविण्यासाठी प्रयत्नशील. कृषी समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्जमाफी व नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहन तसेच युवकांना शब्द अंतर्गत बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयापर्यंत मदत अशा ५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उद्धव ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार गट) यांचा समावेश असून सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस च्या एका नेत्याने काँग्रेस महात्मा गांधी आणि नेहरूंच्या विचारांवर विश्वास ठेवतो. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी याच विचारांची आवश्यकता असल्यामुळे आंबेडकरांच्या नावाची काँग्रेस ला गरज नाही. असे धक्कादायक विधान केले असताना राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांना आकृष्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोकसेवेची पंचसुत्रित(जाहीरनामा) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राची गरज का भासली ? हे न समजणारे कोडे असले तरी या प्रकाराने काँग्रेस चा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आला असून बौद्ध समाजाने सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या