Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा मित्र पक्षांना हुलकावणी देणार ?

• मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेना

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
 भंडारा :- स्वबळावर कोणत्याही पक्षाला निवडणूक लढवून बहुमत मिळविणे अशक्यप्राय बाब आहे. नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक भाजपा व मित्र पक्षाने "महायुती" तर काँग्रेस आणि मित्र पक्षांनी "महाविकास आघाडी" चे नावावर लढविली. त्यात महायुतीचा दणदणीत विजय झाला असला तरी ५ दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटता सुटत नसल्यामुळे भाजपा मित्र पक्षांना हुलकावणी देणार का ? अशा चर्चांना पेव फुटले आहे. 
                   महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार असल्यामुळे निर्वाचन आयोगाकडून १५ ऑक्टोबर २०२४ रोजी घोषणा करण्यात आली. २८८ जागांकरिता २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यात महायुतीला २३० व महाविकास आघाडीला ४६ जागांवर समाधान मानावे लागले. तर इतरांनी १२ जागा जिंकल्या. या पैकी ५ आमदारांचे महायुतीला समर्थन देण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ २३५ झाले आहे. बहुमतापेक्षा महायुतीकडे कितीतरी आमदारांचे संख्याबळ जास्त असताना मुख्यमंत्री पदाबाबद निर्णय होत नाही, हे अनाकलनीय आहे. 
                   युती किंवा आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असा अलिखित नियम असून या बाबद सर्वच पक्षधुरिणांना माहिती असताना मुख्यमंत्री पदाचा पेच कसा व का फसला, हे एक कोडेच आहे. भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंतचा इतिहास पाहता "पोटात एक आणि ओठात वेगळेच" असते. यावरून भाजपा कडून वेळकाढू धोरणाचा अवलंब करून २०२२ व २०२३ ची पुनरावृत्ती करण्याचे खलबते तर सुरू नाही ना ? अशी शंका निर्माण होते किंवा महायुतीतील घटकपक्षांनी ताणून धरल्यास त्यांना हुलकावणी देऊन जुन्या मित्र पक्षाला तर जवळ घेण्याचे  प्रयत्न होत नाही ना ? असा प्रश्न निर्माण होतो. 
                     भारतीय जनता पार्टी कडून जुन्या समीकरणाचा विचार होत असल्यास फायदाच आहे. असे दिसते. कारण महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ला प्रत्येकी ५ ते ७ मंत्री पदे देणे आवश्यक राहील आणि जुने समीकरण नव्याने अस्तित्वात आल्यास जुना सहकारी ३ ते ४ मंत्री पदावर समाधान मानणार असल्याने उर्वरित मंत्री पदे आपसुचकच भाजपास मिळत असल्याने भाजपाच्या राजकीय दृष्टिकोनातून फायदाच होणार आहे. या समीकरणावरून राज्यात पुन्हा राजकीय स्थित्यांतराची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे भाजपा जुन्या मित्र पक्षांना हुलकावणी देणार काय ? अशा चर्चांना पेव फुटले आहे. 

असे आहे पक्षीय बलाबल
भाजपा - १३२, शिवसेना - ५७, राष्ट्रवादी काँग्रेस - ४१, शिवसेना(उबाठा) -२०, काँग्रेस - १६, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) - १०, समाजवादी पार्टी(एसपी) - २, जनसुराज्य शक्ती(जेएसएस) - २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी - १, राष्ट्रीय समाज पक्ष(आरएसपीएस) - १, एआयएमआयएम -१, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(सीपीआयएम) - १, भारतीय शेतकरी व कामगार पक्ष - १, राजश्री शाहू विकास आघाडी - १, अपक्ष - २, एकूण २८८ असे पक्षीय बलाबल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या