Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

• सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचे शेतकऱ्यांना आवाहन 

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- शेतकऱ्यांसह कुटुंबाचा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा. या करिता शासनाकडून कृषी विभागाचे वतीने अनेक योजना चालविल्या जातात. कृषी योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपले सरकार महाडीबीटी उपक्रम राबवित आहे. शेतकरी कोणत्याही वेळी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून राज्य व केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केले आहे. 
                 राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील चांगल्या उत्पादनासाठी कृषी तंत्र खरेदीसाठी अर्थसाहाय्य स्वरूपात अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना केलेल्या अर्जाची सद्यस्थिती ही त्यांच्या वापरकर्ता आयडी वरून कधीही पाहता येते. सुलभ पडताळणी व पारदर्शकता या करिता ७/१२, नमुना ७ अ, आधार कार्ड संलग्न असणाऱ्या बँक खात्याच्या पासबुक ची झेरॉक्स, खरेदीची पावती इत्यादी दस्ताऐवज अपलोड करावे लागतात. महाडीबीटी पोर्टलवर कर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरावर अर्जदारांना एसएमएस व ई-मेल अलर्टचीही तरतूद आहे. असे सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचे म्हणणे आहे. 
               नोंदणीकृत अर्जदार शेतकरी यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभाचे वितरण केले जाते. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जाते. तथा प्रधिकरणासाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभरित्या राबविली जाते. पात्र अर्जाची लक्षांकाच्या अधीन राहून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने लॉटरी काढण्यात येते. त्यानंतर लॉटरीत निवड झाल्याबाबद नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर कळविण्यात येते. निवड झाल्यापासून १० दिवसांत आवश्यक कागदपत्र पोर्टलवर अपलोड करावे. त्यानंतर कृषी विभागामार्फत कागदपत्राची छाननी होऊन १० दिवसांत पत्र देण्यात येते. असे सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी सांगितले. 
*ह्या आहेत योजना(चौकट)*
*सूक्ष्म सिंचन घटक* यात ठिंबक संच, तुषार संच हे ४५ व ५० टक्के या अनुदानावर उपलब्ध केले जाते. *राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना* यात ट्रॅक्टर, इतर अवजारे व यंत्रे खरेदीसाठी ४० ते ६० टक्के अनुदान दिले जाते. *राष्ट्रीय कृषी विकास योजना* यात यांत्रिकीकरण, विहीर, कांदाचाळ, संरक्षित शेती या करिता ४० ते ६० टक्के अनुदानाची सोय आहे. *राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान* कडधान्य, गळीत धान्य, कापूस या करिता बि-बियाणे, यंत्र व अवजारे खरेदीसाठी ५० टक्के अनुदान. *मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना* यात ठिंबक व तुषार सिंचन संच खरेदीसाठी २५ ते ३० टक्के अनुदानाची सोय आहे. *एकात्मिक फलोत्पादन विकास योजना* या अभियानाअंतर्गत ५० टक्के अनुदानावर कांदाचाळ, पॅक हाऊस, पाली हाऊस, शेडनेट हाऊस, शेततळे अस्तरीकरण दिले जाते. *भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना* १०० टक्के अनुदानावर संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, शोभिवंत झाडे लागवड केली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या