• आगीत रोख रक्कम, जीवनावश्यक वस्तू, शेतीपयोगी अवजारे जळून खाक
• शॉर्ट सर्किट ने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, शेतपयोगी साहित्य, रोख रक्कम जळाल्याची घटना पेंढरी येथे शनिवारी(ता.२१ डिसेंबर) पहाटे २:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. मोटारपंपाचे साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव श्यामराव शिवराम काळे(६०), रा. पेंढरी, तालुका लाखनी असे आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून गीता मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन २ लाख ४० हजार रुपये नुकसानीचा पंचनामा तयार करून तालुका प्रशासनाकडे पाठविला आहे.
अल्प भूधारक शेतकरी श्यामराव काळे कुटुंबासह वास्तव्यास असून शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्याचे जुनाट पद्धतीचे कौलारु घर असून समोर स्लॅब आहे. हे घर भरवस्तीत आहे. काळे कुटुंबीय शुक्रवारी रात्री जेवण करून झोपी गेले असता मध्यरात्री दरम्यान तीळतीळ असा आवाज व धुरामुळे कुटुंब प्रमुख श्यामराव काळे यांची झोपमोड झाल्याने घर पेटत असल्याचे निदर्शनास आले. सर्वप्रथम त्यांनी झोपेतील कुटुंबीयांना जागे करून घराबाहेर काढले व आरडाओरड केल्याने गावकरी जमा झाले. प्रशांत काळे, विक्की भोयर, भोजराम काळे, अनिकेत काळे, निखिल काळे, मधुकर काळे, प्रभू काळे व गावकऱ्यांच्या सहकार्याने सत्यभामा भोयर यांचे घरून मोटारपंपाच्या साहाय्याने पाणी ओतून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. पेंढरी चे तलाठी गीता मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यात जीवनावश्यक वस्तू, रोख २४ हजार ५०० रुपये, घरातील संपूर्ण समान, शेतीपयोगी साहित्य व घरास असलेला लाकूड फाटा, कवेलू जळून खाक झाल्याने २ लाख ४० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसा पंचनामा करून तहसीलदार लाखनी यांचेकडे पाठविला आहे. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
0 टिप्पण्या