- जिल्हाधिकारी प्रजित नायर
• स्वामित्व योजनेंतर्गत पांजरा येथे सनद वाटप कार्यक्रम
• जिल्ह्यातील 456 गावात सनद प्राप्त
चित्रा न्युज ब्युरो
गोंदिया: मालकी हक्कावरुन होणाऱ्या वाद-विवादावर आता स्वामित्व योजनेअंतर्गत लगाम बसणार असून गावातील गावठाणातील मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका तयार होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.
जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील जि.प.हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा पांजरा येथे आज स्वामित्व योजनेचा शुभारंभ करण्यात आला, त्यानिमित्ताने आयोजित सनद वाटपाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थावरुन बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मधुकर वासनिक, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसिलदार समशेर पठाण, गटविकास अधिकारी आनंदराव पिंगळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख अजय क्षीरसागर, विस्तार अधिकारी (पंचायत) चुन्नीलाल गावड, जि.प.सदस्या वैशाली पंधरे, पांजरा ग्रामपंचायत सरपंच भुमेश्वरी नागपुरे व उपसरपंच रमन लिल्हारे मंचावर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी 12.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सदर योजनेअंतर्गत देशातील 230 हून अधिक जिल्ह्यांतील सुमारे 50 हजार गावांमधील मालमत्ताधारकांना स्वामित्व योजनेअंतर्गत 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, मिझोराम, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासीत प्रदेशातील मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी कार्ड वितरीत करण्यात आले.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील 711 गावांमध्ये स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्व्हे करण्यात आले आहे. त्यापैकी 456 गावांचे सनद प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सनदची संख्या 61 हजार 468 आहे. 7/12 ला जसा मालकी हक्काचा पुरावा असतो तसा कायदेशीर मालकी हक्काचा अधिकार आता स्वामित्व योजनेअंतर्गत अभिलेख मिळकत पत्रिका (Property Card) व नकाशा तयार होणार आहे. या योजनेमुळे उत्पन्नाचे स्त्रोत वाढेल. सदर मिळकतीवर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्काबाबत व हद्दीबाबत होणारे वाद याद्वारे कमी होतील. ग्रामपंचायत कडील मालमत्ता कर निर्धारण पत्रक (नमुना 8 नोंदवही) स्वयंचलनाने तयार होईल. याद्वारे ग्रामपंचायतीची आर्थिक पत उंचावेल. सोईसुविधा व शासनाचे सर्व नियोजन करण्यासाठी मदत होणार आहे. शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे याद्वारे संरक्षण होणार आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत आता गावातील रस्ते, घरे, शासनाच्या/ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांचे क्षेत्र व सीमा निश्चित होतील व मिळकतींचा नकाशा तयार होईल. जमिनीचे मोजमाप कसे करायचे याबाबत यापुर्वी बऱ्याच त्रुटी होत्या, त्या त्रुटींचे आता स्वामित्व योजनेंतर्गत निराकरण करण्यात आले आहे. आता घराच्या मालकी हक्काच्या आधारावर आपण कर्ज घेऊ शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. मुरुगानंथम म्हणाले, स्वामित्व योजनेअंतर्गत आता अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावठाणातील मिळकतीचे अचूक मोजमाप, नकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे सोपे व सुलभ झाले आहे. सदर योजनेंतर्गत सीमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे व वेळेत पूर्ण होतील. यामध्ये मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी असून कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा उपलब्ध झालेली आहे. जमिनीशी संबंधीत मतभेदाचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. याद्वारे मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ होणार असून आता सदर योजनेंतर्गत गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना मिळणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात अमृत कवरे, हरकंताबाई गजबे, भास्कर नागपुरे, जियालाल फरकुंडे, हनसराम लिल्हारे, तेजराम लिल्हारे, रामचंद्र लिल्हारे, देवराम लिल्हारे, जयचंद लिल्हारे, उल्हासराव कांबळे, भैय्यालाल कांबळे, बिसन शेंदरे, हरकंता गजबे, सरस्वताबाई परसमोडे व अमृता शेंदरे यांना मान्यवरांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपअधीक्षक भूमी अभिलेख अजय क्षीरसागर यांनी केले. सुत्रसंचालन तहसिलदार समशेर पठाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मधुकर वासनिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत अधिकारी नरेश्चंद्र येळे, मुख्याध्यापक शेखर गेडाम, शिक्षक हेमकृष्ण टेंभूर्णे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सनद वाटप लाभार्थी व पांजरा ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या