चित्रा न्युज ब्युरो
भद्रावती : वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते. आपल्या समाजात 'वाचाल तर वाचाल' अशी म्हण प्रचलित आहे. असे विचार विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरूषोत्तम स्वान यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात वाचन पंधरवडा निमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी सभागृहात प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, उपप्राचार्य तथा ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. सुधीर आस्टुनकर, वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष स्वान म्हणाले की, वाचनाची सवय हा माणसाच्या अंगी असलेला सर्वोत्तम गुण आहे. पुस्तक हे एका कारणास्तव तुमचे चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळे वाचनाची चांगली सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. वाचनाची गोड फळे चाखण्यासाठी आपण सर्वांनी रोज किमान ३० मिनिटे वाचले पाहिजे. निवांत जागी बसून वाचनाचा आनंद मिळतो. चांगले पुस्तक वाचणे हा सर्वात आनंददायक अनुभव असतो असे विचार व्यक्त केले. श्री. स्वान यांच्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावेळी शाॅल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी विवेकानंद संगीत कला अकादमीच्या कलाकारांनी सुरेल आवाजात हिंदी मराठी गिते गाऊन संगीतमय वातावरण केले. प्राध्यापकांनीही भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर आष्टुनकर, संचालन डॉ. ज्योती राखुंडे, आभार प्रदर्शन प्रा.नरेंद्र लांबट यांनी केले. यावेळी वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील
प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या