Ticker

6/recent/ticker-posts

खेळाडूंना नोकरीच्या विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी- नंदा खुरपुडे

• राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा

चित्रा न्युज ब्युरो
गोंदिया : मानवी जीवनामध्ये सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी क्रीडा व खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. महाराष्ट्र शासनाने खेळाडूंना नोकरी क्षेत्रात 5 टक्के आरक्षण ठेवले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना नोकरीमध्ये थेट नियुक्तीचे प्रावधान करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना नोकरीच्या विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध असल्याचे मत जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले.

        जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे 15 जानेवारी रोजी आयोजित राज्य क्रीडा दिनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गाईडच्या जिल्हा संघटक चेतना ब्राम्हणकर, स्काऊटचे जिल्हा संघटक पराग खुजे, क्रीडा मार्गदर्शक अविनाश निंबार्ते, आनंद मकवाना, चेतन मानकर, आशिष चौव्हाण, रविंद्र वाळके, सुषमा नागपुरे, लिखेंद्र जयतवार, प्रशांत वासनिक, ज्योती पहरे, श्री. उईके उपस्थित होते.

        सदर कार्यक्रमांतर्गत 15 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक चेतना ब्राम्हणकर, क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांच्या हस्ते व आशिष चौव्हाण, पराग खुजे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिरवी झेंडी दाखवून महारॅलीला प्रारंभ करण्यात आला. श्री महावीर मारवाडी हायस्कुल गोंदिया तसेच इतर क्रीडाप्रेमी, नागरिक व खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

         क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, भारत स्काऊट गाईड शिक्षण विभाग व जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना यांचे संयुक्त विद्यमाने 15 जानेवारी हा दिवस ऑलिंपिकवीर स्व. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

         सदर कार्यक्रतांतर्गत ऑलिंपिकवीर स्व. खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते म्हणून डॉ.आनंद मकवाना, चेतन मानकर, आशिष चौव्हाण यांनी खाशाबा जाधव यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून खेळाचे व व्यायामाचे महत्व विस्तृत स्वरुपात विशद केले. तद्नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडू एकनाथ बर्वे (सॉफ्ट टेनिस) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

      राज्य क्रीडा दिनानिमीत्त गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक खेळांचे प्रदर्शनीय सामने, खेळांचे मार्गदर्शन शिबीर, करिअर संधी बाबत खेळाडूंसोबत परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्काऊटचे जिल्हा संघटक पराग खुजे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र कोचे, वसंता विहिरघरे, शिवचरण चौधरी, शेखर बिरनवार, जयश्री भांडारकर, किसन गावड, निकीता बोरकर, अनिल बागडे यांनी परिश्रम घेतले.

                                                                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या