चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आज राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ सर्वसाधारण बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने दिलेल्या मर्यादेनुसार ४३०.९७ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करताना विविध विकासकामांसाठी २१८ कोटी रुपये अतिरिक्त निधीची मागणी केली. सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाढीव निधी देण्याचा प्रयत्न करू. निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करावा, असे निर्देश यावेळी अजित पवार यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 करिता नियोजन विभागामार्फत सांगली जिल्ह्यासाठी कमाल नियतव्यय 430 कोटी 97 लाख रूपये कळविण्यात आला होता. जिल्ह्याच्या स्थानिक गरजेनुसार कार्यान्वयीन यंत्रणांकडून 218 कोटी रूपये अतिरीक्त निधी मागणी करण्यात आली. यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधीची जरी मर्यादा घालून दिली असली तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरीक्त निधीची मागणी केली आहे. वाढीव निधी देणार आहोत, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.
अजित पवार पुढे म्हणले, सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल उपक्रमासाठी शासनाकडून निधी देऊ. त्याचबरोबर या उपक्रमासाठी लोकसहभाग व लोकवर्गणीसाठी प्रयत्न करावा. मॉडेल स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची सांगड घालण्यासाठी प्रशासन प्रमुखांनी नियोजन करावे. शासकीय इमारती व महापालिका क्षेत्रातील पथदिवे व पाणीयोजनांची विजेची गरज सौरउर्जेतून भागवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील संरक्षित स्मारकांची यादी तयार करून त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनास सादर करावा, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीतून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्याचे आवाहन केले.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, इद्रिस नायकवडी, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, सुहास बाबर, रोहित आर. आर. पाटील, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील व कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी प्रत्यक्ष तर जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल ई- उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या