चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी शहरातील हॉटेल टुरिस्ट लॉजमध्ये चालवण्यात येणाऱ्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अनैतिक व्यवसायप्रकरणी मुख्य संशयित हॉटेल मालक दीपक सोमनाथ तलवाड (वय ४२) याचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयाने धुडकावून लावला आहे. या खळबळजनक प्रकरणात न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, अर्जदाराचा थेट सहभाग असून त्याच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे.
दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी, बार्शी शहरातील कुख्यात हॉटेल टुरिस्ट लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक (PI) बजरंग साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक (PSI) सविता कोकणे यांनी विशेष पथकासह या हॉटेलवर छापा टाकला. छाप्यात तीन खोल्यांमध्ये महिलांचा देहविक्रीसाठी जबरदस्तीने वापर केला जात असल्याचे आढळून आले.
हॉटेल व्यवस्थापकाने या व्यवसायासाठी खोल्या भाड्याने देऊन बेकायदेशीर स्वरूपात आर्थिक फायदा मिळवल्याचे स्पष्ट झाले. तसेच, हॉटेल मालक दीपक तलवाड याने यापूर्वी देखील अनैतिक धंद्यासाठी हॉटेलचा वापर करून घेतल्याचा इतिहास असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करताना अर्जदाराच्या वतीने ॲड. आर.आर. पाटील यांनी न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला की, "अर्जदाराचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, तसेच त्याचे नाव प्रथमदर्शनी तक्रारीत नमूद नाही. हॉटेलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी राजेंद्र मराठे यांच्याकडे होती, त्यामुळे अर्जदार निर्दोष आहे."
मात्र, सरकारी पक्षाचे वकील (Ld. A.P.P.) ॲड. देशमुख यांनी जोरदार प्रतिवाद करत न्यायालयासमोर स्पष्ट केले की,
हॉटेल मालक म्हणून दीपक तलवाड याची पूर्ण जबाबदारी आहे. हॉटेलच्या खोल्या वेश्याव्यवसायासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती त्याला पूर्णपणे होती.
पूर्वी देखील याच हॉटेलविरोधात सन २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामुळे याला वारंवार अशा कृत्यांमध्ये संलिप्त राहण्याची प्रवृत्ती आहे.
अर्जदाराला जामीन दिल्यास तो पुरावे नष्ट करण्याचा तसेच साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतो.
बार्शी सत्र न्यायालयाने सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला मान्यता देत अर्जदाराचा जामीन अर्ज फेटाळला आणि पुढील निरीक्षणे नोंदवली—
1. हॉटेल मालकाच्या संमतीशिवाय अशा प्रकारच्या अनैतिक व्यवसायाचा व्यवहार चालू शकत नाही.
2. वेश्याव्यवसायासाठी ठिकाण उपलब्ध करून देणे हा कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा आहे आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र पोलीस कायदा व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PITA) कठोर कारवाई आवश्यक आहे.
3. तपास यंत्रणेस सहकार्य करण्याऐवजी अर्जदार न्यायालयाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकतो, त्यामुळे त्याला जामीन मंजूर करता येणार नाही.
4. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांनुसार, हॉटेल मालक किंवा व्यवस्थापकाने कोणत्याही अनैतिक कृत्यास परवानगी दिली असेल, तर तो गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात सहभागी ठरतो.
हा निर्णय म्हणजे वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या आणि त्यास खतपाणी घालणाऱ्या हॉटेल मालकांसाठी स्पष्ट इशारा आहे की, असे समाजविघातक कृत्य करणाऱ्या कोणालाही न्यायालय सोडणार नाही.
यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या