Ticker

6/recent/ticker-posts

नागपूर जिल्हा वार्षिक योजनेतून साकारलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कौतुक


▪️महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या आग्रही मागणीला यश

▪️जिल्ह्यास मिळणार वाढीव निधी

चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर: पर्यटन क्षेत्रातील नागपूर जिल्ह्याला उपलब्ध असलेली संधी लक्षात घेऊन जिल्हा वार्षिक योजना व इतर योजनेंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, विकास कामे उत्तम झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्ह्यासाठी  भविष्यातील गरजा ओळखून राबविलेले उपक्रम व विकास कामे इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय आहेत या शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले.

जिल्हा नियोजन समितीच्या राज्यपातळीवरील आढावा बैठकीत त्यांनी नागपूर जिल्ह्याचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सर्वश्री आमदार कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा नागपूर जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेचा 1 हजार 611 कोटी 98 लक्ष 68 हजार एवढा प्रारुप आराखडा आहे. या आराखड्याला महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नुकतीच मंजूरी प्रदान करण्यात आली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत जिल्ह्याला अधिक निधी मिळावा अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली.  संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर  नागपूरची गरज लक्षात घेता  वाढीव निधी उपलब्ध करू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात  रुग्णालयाचे बांधकाम, विस्तारीकरण, पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा, वन पर्यटन, इको टूरिझम, यात्रा स्थळांचा विकास, कोलीतमारा ते नवेगाव खैरीपर्यंत बोट सफारी, बालोद्यान, एटीव्ही वाहने, पॅरामोटरिंग, हॉट एअर बलून, सायकल सफारी, डॉर्क स्कॉय सॅनच्युरी, पर्यटन,दवाखाना आपल्या दारी, मोबाईल ऑय स्कीनींग बस, मलनिस्सारण प्रकल्प, डिजीटल क्लास रुम, गॅस शवदाहिनी आदी नाविण्यपूर्ण योजनांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सादरीकरणाद्वारे दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही कामे समजून घेत कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या