Ticker

6/recent/ticker-posts

वैराग शहरात सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृत विक्रीस प्रतिबंध – पोलिसांची कारवाई सुरू

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-वैराग शहरात सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरीत्या रस्त्यावर विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात बी.एन.एस. कलम 285 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक (पोकॉ) शरद कांबळे व त्यांचे सहकारी सहायक पोलीस फौजदार गवळी आणि पोलीस कर्मचारी कांबळे हे वैराग ते माढा मार्गावर गस्त घालत होते. गस्तीदरम्यान सार्वजनिक रस्त्यावर होजिअरी व साड्यांचे बॉक्स लावून विक्री करणारा इसम आढळून आला. यामुळे वाहनांची आणि पादचाऱ्यांची ये-जा अडथळित होत असल्याचे पोलिसांनी पाहिले.

संबंधित इसमाचे नाव किरण भिवा शिंगाडे (वय 37, रा. बंगले गल्ली, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे असून, त्याच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर दुपारी 1:00 वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना पोलिसांनी एका महिलेच्या भाजीपाला विक्रीच्या गाड्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणले. पोलिसांनी विचारपूस केली असता, संबंधित महिलेचे नाव शोभा शिवाजी काळे (वय 50, रा. बंगले गल्ली, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे समजले. तिने रस्त्यावर भाजीपाला विक्री करण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याने तिच्याविरोधात देखील बी.एन.एस. कलम 285 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

त्यानंतर दुपारी 1:30 वाजता पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर फळ विक्री करणाऱ्या आणखी एका इसमाला आढळून काढले. त्याचे नाव अझरुद्दीन मोहमंद हनीफ बागवान (वय 29, रा. बागवान गल्ली, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे असून, तो रस्त्यावर फळ विक्री करत होता. यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.

वैराग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन तुकाराम गावडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत विक्री करून वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

वैराग पोलिसांनी नागरिकांना आणि व्यावसायिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत विक्री करू नये. जर कोणीही परवानगीशिवाय किंवा वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने विक्री करताना आढळून आले, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे. तसेच, अधिकृत परवानगी घेतल्यानंतरच सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या