घारी येथेल प्रकार
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर –: पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घारी गावात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी आकाश बापु उकिरडे (वय ३२, व्यवसाय – मजुरी, रा. घारी, ता. बार्शी) यांच्यावर गावातील काही व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
फिर्यादी आणि त्यांची पत्नी कोमल हे मोटारसायकलवरून अक्षय हॉटेलजवळून जात असताना, त्यांना गावातील नागेश धनाजी उकिरडे, महेश धनाजी उकिरडे, संदेश धनाजी उकिरडे हे तिघेजण दिसले. फिर्यादीने त्यांना विचारले की, “तुम्ही फोनवर शिवीगाळ का केली?” यावरून वाद निर्माण झाला. त्यावेळी नागेश उकिरडे याने फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर, राम बसाटे यांच्या घरासमोर असताना संदेश उकिरडे याने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने डोके बाजूला केल्याने तो वार त्यांच्या कानामागे लागला आणि गंभीर जखम झाली. त्याचवेळी नागेश उकिरडे याने लोखंडी गजाने फिर्यादीच्या उजव्या हातावर आणि डोक्यावर जोरदार मारले. यानंतर गणेश बबन उकिरडे व महेश धनाजी उकिरडे यांनी हातातील लाकडी काठ्यांनी फिर्यादीच्या पाठीवर, हातावर आणि पायावर बेदम मारहाण केली.
सदर भांडण सुरू असताना फिर्यादीची पत्नी कोमल या आपल्या पतीला सोडवण्यासाठी पुढे आली. त्यावेळी नागेश उकिरडे याने तिलाही शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला.
हल्लेखोरांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला धमकी दिली की, “यापुढे आमच्या नादी लागलात तर तुम्हा दोघांना जिवे ठार मारू.” या प्रकारानंतर फिर्यादीची पत्नी कोमल हिने आपल्या नातेवाईकांना बोलावले. नंतर बबन उकिरडे आणि नितीन उकिरडे यांनी फिर्यादीस मोटारसायकलवर बसवून पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी धाराशिव येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवले. ९ ते १२ मार्च दरम्यान तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
फिर्यादीने आज दिनांक १२ मार्च २०२५ रोजी पांगरी पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार नोंदविली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ११८(२), ३(५), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपींना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता बाळगली आहे.
0 टिप्पण्या