Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मा. आ. राजेंद्र राऊत मित्रमंडळ व डॉ. शेटे नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्य संवर्धनास चालना देण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन अंकिता रणवीर राऊत व मृणाल रणजीत राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. या शिबिराचे मुख्य संयोजन ॲड. महेश जगताप यांनी केले.

या शिबिरामध्ये महिला आरोग्य तपासणी व नेत्र चिकित्सा या दोन महत्त्वाच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि त्यावरील उपाय याविषयी डॉ. दीपक जगताप, डॉ. गजानन शेटे, डॉ. राजश्री शेटे, डॉ. सुबोध केसकर आणि डॉ. संपदा केसकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

नेत्र तपासणी आणि इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला. डोळ्यांच्या आरोग्यासंदर्भात माहिती देत तज्ज्ञ डॉक्टरांनी आवश्यक सल्ला दिला. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देत, निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.

या आरोग्य शिबिरास परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांसाठी आरोग्य तपासणी आणि नेत्र चिकित्सा सुविधा एकाच ठिकाणी मिळत असल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक झाले.

कार्यक्रमास बप्पा जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रतिभा महेश जगताप, संगीता जाधव, रूपाली जाधव, आरती नागटिळक, अपर्णा जगताप तसेच माळे गल्ली, सावळे गल्ली आणि ब्राह्मण गल्लीतील महिलांनी विशेष मेहनत घेतली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. महिलांच्या आरोग्य जपणुकीसाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या