Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांचे बार्शी शहरातील नागरिकांना आवाहन: सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. सध्या गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हे सण जवळ आले आहेत. या कालावधीत धार्मिक भावना दुखावतील अथवा समाजामध्ये तेढ निर्माण करतील, अशा स्वरूपाच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक कुकडे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह, धार्मिक भावना दुखावणारी किंवा द्वेषपूर्ण पोस्ट आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात पोलीस विभागाने सोशल मीडियावर करडी नजर ठेवली असून, सायबर सेलमार्फत सतत निरीक्षण केले जात आहे. आतापर्यंत अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी सुमारे १० ते १२ जणांविरुद्ध कारवाई झाली आहे.

पोलीस निरीक्षक कुकडे यांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, आक्षेपार्ह पोस्ट केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा दाखल केला जाईल. यामुळे संबंधित व्यक्तीच्या भविष्यकाळावर परिणाम होऊ शकतो. गुन्हा दाखल झाल्यास शासकीय नोकरीसाठी आवश्यक असलेल्या पोलीस सत्यापन प्रमाणपत्रावर (Police Verification Certificate) परिणाम होऊ शकतो. अशा गुन्ह्यांची नोंद असल्यास व्यक्तीला शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील नोकरी मिळण्यात अडचण येऊ शकते.

पोलीस विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी विचारपूर्वक कृती करावी. अफवा पसरविणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाळाव्यात. जर कोणी अशा पोस्ट शेअर करत असेल किंवा प्रसारित करत असेल, तर त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

"सण हे सामाजिक ऐक्य आणि शांततेचे प्रतिक असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या पोस्टमुळे सामाजिक सौहार्द बिघडणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी," असे आवाहन पोलीस निरीक्षक बालाजी कुकेडे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या