चित्रा न्युज प्रतिनिधी
धडगांव : धडगांव तालुक्यातील शेलदा गांवातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगरद-यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे.डोंगरद-याची एवढी बिकट वाट आहे की, हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो; घरात अर्धा हंडाच पाणी पोहचते. हर घर नल चा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे.या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे,प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहचवणे हा मुख्य उद्देश असला तरी शेलदा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहचली आहे,पाणी मात्र पोहचलेच नाही.या गावाची एकूण १००९ लोकसंख्या आहे.गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.गावाचे सरपंच दुंगीबाई रेहमल पावरा यांच्याघरातच जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पोहचले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.सरपंच बाईलासुद्धा हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.या गावाचे साप-यापाडा,बारीपाडा व बर्डीपाडा अशा ३ पाड्यात लोक राहतात. जलजीवन मिशन योजनेंतर्गत फक्त साप-यापाडा येथे ३ टाक्या बांधण्यात आल्या आहेत, बारीपाडा व बर्डीपाडा येथे ही योजना पोहचलीच नाही.गांवात लहान बालकांसाठी अंगणवाडी आहे.या मुलांना पोषण आहार शिजवण्यासाठी पाणी मिळत नाही,अंगणवाडी सेविकांना डोंगरद-यातून हंडाभर पाणी आणून आहार शिजवून द्यावा लागतो.पाण्याची सोय झाल्यावर पोषण आहार चांगल्याप्रकारे शिजवून देता येईल, बालकांना पाणी प्यायला मिळेल, पाण्याची सोय झाली तर अनेक समस्या सुटतील, असे अंगणवाडी सेविका म्हणत आहेत.
या गांवात २ जिल्हा परिषद शाळा व ३ अंगणवाडी आहेत, परंतु शाळा व अंगणवाडीची इमारत बांधकाम करण्यास वनविभाग परवानगी देत नाहीत. ग्रामपंचायत इमारत बांधण्यासही वनविभाग अडथडा निर्माण करते.पाण्यासाठी हॅन्डपंप वनविभाग खोदू देत नाहीत.जमीन नावावर करावी,पाण्याची सोय करावी,वीज उपलब्ध करून द्यावी,शाळा,अंगणवाडी ग्रामपंचायत इमारत बांधू द्यावे,अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,धडगांव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी,शेलदा गांवातील तुवाज्या पावरा,प्रताप पावरा,राजेंद्र पावरा,दारासिंग पावरा,दिलवरसिंग पावरा,वेल्ला पावरा,डोंग्या पावरा,छोटा पावरा,वोपारी पावरा, गिसली पावरा,मिना पावरा,सेवी पावरा,दमणी पावरा आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
0 टिप्पण्या