Ticker

6/recent/ticker-posts

माढा येथील शिवाजी चौकात मासे विक्रीस अडथळा; पोलिसांनी दिली नोटीस

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :- माढा येथील शिवाजी चौकात सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करून मासे विक्री केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी संबंधित विक्रेत्याला नोटीस दिली आहे. या घटनेबाबत माढा पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १३ मार्च रोजी सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल राहुल तुळशीराम रिकीबे (पोलिस हवालदार, माढा पोलीस ठाणे) व त्यांचे सहकारी पोहेकॉ. साळुंखे आणि पोहेकॉ. घुगे हे शहरात पेट्रोलिंग करत असताना शिवाजी चौकात एक व्यक्ती मोटारसायकलवरून मासे विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.

सदर मोटारसायकल ही फॅशन प्लस कंपनीची निळ्या रंगाची, क्रमांक MH13AM4227 होती. सार्वजनिक रस्त्यावर गाडी उभी करून मासे विक्री सुरू असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण होत होता. यामुळे संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता.

पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता संबंधित मासे विक्रेता आशपाक शौकत मुल्ला (वय २८, व्यवसाय – मासे विक्री, रा. कसबापेठ, माढा, जि. सोलापूर) असल्याचे स्पष्ट झाले. त्याला घटनास्थळीच बी.एन.एस.एस. कलम ३५ (३) नुसार नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

मात्र, सार्वजनिक ठिकाणी या प्रकारे अडथळा निर्माण करणे आणि नागरिकांच्या जिवीत धोका निर्माण होईल अशा पद्धतीने व्यवसाय करणे हा भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा असल्याने पोलिसांनी या प्रकरणी कलम २८५ अन्वये कायदेशीर फिर्याद नोंदवली आहे.

या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करून तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक नेताजी सुखदेव बंडगर यांनी स्वीकारली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या कोणत्याही कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या