चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी शहरातील आदर्श मंगल कार्यालयाच्या पाठीमागील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पंकज नागनाथ भालेराव (वय 35, रा. वाणी प्लॉट, बार्शी, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
दि. 21 मार्च 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता पंकज भालेराव हा आपल्या मित्रासोबत आदर्श मंगल कार्यालयाच्या मागील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच त्याचा भाऊ राहुल नागनाथ भालेराव (वय 32, रा. वाणी प्लॉट, बार्शी) याला मित्र सागर राजेंद्र घाडगे याने फोन करून सांगितले. ही माहिती मिळताच राहुल भालेराव तात्काळ खाजगी वाहनाने घटनास्थळी पोहोचला.
घटनेची माहिती मिळताच बार्शी नगरपालिकेचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ विहिरीतील पाण्यात शोधमोहीम राबवली. मात्र, काही वेळाच्या शोधानंतर पंकज भालेराव याचा मृतदेह पाण्यात आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच मृताचे भाऊ राहुल भालेराव यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत.
पंकज भालेराव याच्या मृत्यूमुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या घरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बार्शी परिसरात शोककळा पसरली आहे.


0 टिप्पण्या