१७ अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन तब्बल ३ ट्रक्टर माल जप्त
विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी,,
नांदेड, :- शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली असुन दिनांक ११.०३.२०२५ रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने वजिराबाद परिसरातील महावीर चौक ते मुथा चौक वजिराबाद रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने १७ अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली तसेच तब्बल ०३ ट्रक्टर माल जप्त करण्यात आला आहे.
सदरील कारवाई *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त श्री गिरीश कदम* यांच्या मार्गदर्शनाखाली *उपआयुक्त श्री स. अजितपालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. गुरुव्दारा मुख्य रस्त्यावरील रहदारीस व पदचाऱ्यास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याच्या हेतुने ही कारवाई करण्यात आली असुन या कारवाईत अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री रावण सोनसळे, पोलीस निरीक्षक श्री कदम, वाहतुक पोलीस निरीक्षक श्री गुट्टे, अग्निशमन अधिकारी श्री के. जी. दासरे, अतिक्रमण पथक प्रमुख श्री विशाल सोनकांबळे, श्री अनिल चौदंते व पथकातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
महानगरपालिका हद्दीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्ते अथवा इतरत्र अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासना तर्फे देण्यात येत असुन यापुढे सुध्दा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण धारकावर कारवाई करण्याची मोहिम सुरुच राहील असे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले,


0 टिप्पण्या