चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर: -वैराग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मौजे दहिटणे परिसरात गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एक आयशर कंपनीचा टेम्पो पकडला. या वाहनामध्ये निर्दयपणे कोंबून नेण्यात येणाऱ्या जर्शी जातीच्या गायी आढळून आल्या असून, त्या कत्तलीसाठी नेत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
ही कारवाई दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 9 वाजता करण्यात आली. पोलीस हवालदार आकाश पवार (पोकॉ/797), सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व 12 होमगार्ड यांच्या पथकाने मौजे दहिटणे येथे गुप्त माहितीवरून धाड टाकली. या वेळी एम.एम. 24 जे 7868 या क्रमांकाचा चॉकलेटी रंगाचा आयशर टेम्पो संशयास्पदरित्या उभा असल्याचे आढळले. पाहणीअंती सदर टेम्पोमध्ये एकूण 14 जर्शी गायी, एक वासरू व एक मृत गाय असल्याचे निदर्शनास आले.
वाहनातील जनावरांची स्थिती अत्यंत दयनीय होती. वाहनात कोणत्याही प्रकारची चारापाणी किंवा औषधोपचाराची व्यवस्था नव्हती. जनावरे कोंबून भरल्यामुळे त्यांना हालचालही करता येत नव्हती. प्राण्यांच्या छळाचे हे स्पष्ट उदाहरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सदर टेम्पो चालक घटनास्थळी मिळून आला नाही. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन वैराग पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर पोलीस नाईक माळी व दोन होमगार्ड यांच्या मदतीने जनावरे बार्शी येथील गोशाळेत सुरक्षितरित्या हलविण्यात आली.
वाहन व जनावरांची एकूण अंदाजित किंमत 4 लाख 42 हजार रुपये असून, पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 आणि प्राण्यांचे परिवहन नियम 1978 अंतर्गत विविध कलमांनुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणी पुढील तपास वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कंगले हे करीत आहेत.


0 टिप्पण्या