Ticker

6/recent/ticker-posts

जमिनीच्या वादातून पुतण्याचा अमानुष हल्लावृद्ध काकाचा डोक्यात जबर वार

 
करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील शिवारात जमिनीच्या वादातून पुतण्याकडून सख्ख्या काकाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ७९ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्राप्त माहिती नुसार, फिर्यादी कांतीलाल एकनाथ नरसाळे (वय ७९, रा. जळोली, ता. पंढरपूर) हे १० एप्रिल रोजी सायंकाळी चारच्या सुमारास आपल्या गट नंबर १५/२/३ मधील शेतात गेले असता, त्यांच्या शेतात जनावरे बांधलेली असल्याचे त्यांना दिसले. यासंदर्भात त्यांनी शेतात असलेल्या आपल्या पुतण्या महेश मधुकर नरसाळे याला विचारणा केली. त्यावर महेशने "ही जमीन माझी आहे, तू इथे कशाला आला?" असे म्हणत शिवीगाळ करत काकाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर जवळच पडलेली लोखंडी सळई उचलून त्याने कांतीलाल नरसाळे यांच्या डोक्यात जोरात वार करून त्यांना जखमी केले.

या भांडणात महेशची पत्नी सोनाली आणि अमोल नरसाळे याची पत्नी चैताली यांनीही हस्तक्षेप करत कांतीलाल यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. आवाज ऐकून फिर्यादींची पत्नी रसिका यांनी धाव घेत हस्तक्षेप करत वाद सोडविण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर कांतीलाल नरसाळे यांनी आपल्या मुलगा गुरुनाथ याला घडलेला प्रकार सांगितला व त्याच्यासोबत करकंब पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांना तातडीने सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठवले. उपचारानंतर त्यांनी आपला जबाब पोलीस ठाण्यात नोंदवला.

या प्रकरणी करकंब पोलिसांनी महेश मधुकर नरसाळे, सोनाली महेश नरसाळे आणि चैताली अमोल नरसाळे (सर्व रा. जळोली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३५२, ३५१(२), ३(५), ११८(१), ११५(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर दिलीप कुंजीर करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या