चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-"गावाच्या मधोमध कुऱ्हाडीने डोकंच फोडलं, आणि वर सोनसाखळीही हिसकावून नेली!" – अशा थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रकारामुळे भाळवणी गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. गावात भरदुपारी पाच जणांच्या टोळक्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात झोपवलं. ही घटना 2 एप्रिल रोजी घडली असून, 9 एप्रिल रोजी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जखमी आकाश कल्याण शिनगारे (वय 24, रा. वांगी नं.3, ता. करमाळा) याने दिलेल्या जबाबानुसार, तो त्याचा मित्र अर्जुन कांबळे याच्यासोबत भाळवणी बसस्टँडजवळून जात असताना, त्यांच्या ओळखीचा आदित्य शिंदे हा तिथं थांबलेला दिसला. त्याच्याशी बोलण्यासाठी गाडी थांबवली, आणि काही क्षणातच गावातील नवनाथ कोपनर, अण्णा कोपनर, नितीन कोपनर, अमोल कोपनर आणि अनिल पोडोळे हे पाच जण आले आणि आदित्य शिंदे याला लाथाबुक्यांनी, बेल्टने, काठीने आणि शिवीगाळ करत बेदम मारहाण करू लागले.
आकाश आणि अर्जुन हे भांडण सोडवायला गेले, तर या टोळक्याने त्यांच्यावरही हल्ला चढवला. "तुम्ही मध्ये का आलात?" असं म्हणत त्यांना देखील लाथाबुक्यांनी, केबल वायरने, बेल्टने आणि काठीने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता नवनाथ कोपनरने हातातली कुऱ्हाड घेऊन थेट आकाशच्या डोक्यात घाव घातला. डोकं फुटून रक्ताच्या सांडव्यात आकाश खाली कोसळला.
हल्लेखोरांनी या गोंधळातच आकाशच्या गळ्यातली अर्ध्या तोळ्याची सोनसाखळीही हिसकावून नेली. आरडाओरड ऐकून सचिन धेंडे आणि कांतीलाल धेंडे हे मदतीला धावले. पण तोवर हे पाचही आरोपी मोटारसायकलवर बसून पळून गेले.
जखमींना उपचारासाठी तातडीने संगम येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आलं. अर्जुनवर प्राथमिक उपचार करून त्याला सोडण्यात आलं, तर आकाशच्या डोक्यावर पाच टाके पडल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अकलूज येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या आकाशची प्रकृती स्थिर असून तो पूर्णपणे शुद्धीत आहे.
या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात 9 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 115(2), 118(1), 119(1), 189, 190, 191, 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 टिप्पण्या