Ticker

6/recent/ticker-posts

अपघातातील निष्काळजी ट्रक चालकावर गुन्हा दाखल : अपघातात तरुण चालकाचा मृत्यू


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर – हैद्राबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डोंड्डी फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात परमेश्वर अर्जुन सुरवसे (वय 34, रा. बोळेगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या तरुण ट्रकचालकाचा मृत्यू झाला. या अपघातात निष्काळजीपणे ट्रक उभा करणाऱ्या अज्ञात चालकावर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजता परमेश्वर सुरवसे हे ट्रक क्रमांक एम.एच.10 झेड 4129 चालवत असताना डोंड्डी फाटा, बावी पेट्रोल पंप समोर, हैद्राबाद-सोलापूर महामार्गावर दुसऱ्या ट्रक क्रमांक के.ए.56 6098 वर आदळून गंभीर जखमी झाले. ट्रक क्रमांक के.ए.56 6098 हा महामार्गाच्या मध्यभागी इंडिकेटर व रिफ्लेक्टर न लावता निष्काळजीपणे थांबवण्यात आलेला होता. अंधार असल्यामुळे ट्रक लक्षात न आल्याने परमेश्वर सुरवसे यांचा ट्रक थेट त्या ट्रकच्या मागच्या बाजूस आदळला. अपघातात ते गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

परमेश्वर सुरवसे यांच्या पत्नी अनुसया परमेश्वर सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, अपघातानंतर अंत्यविधी व कुटुंबीयांवरील दुःखामुळे तक्रार दाखल करण्यात उशीर झाला. मात्र घटनेनंतर त्यांच्या दिर व इतर नातेवाईकांसह घटनास्थळी पोहचून अपघाताबाबत माहिती घेतली असता निष्काळजी ट्रकचालकाचे दोष स्पष्ट झाले.

सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या FIR क्रमांक 0207 नुसार, अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 134(A), 134(B), तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 106(1), 125(b), 281 आणि 285 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल पांडुरंग देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या अपघाताने एक कुटुंब उध्वस्त झाले असून, निष्काळजी ट्रक चालकाने अपघाताची माहिती न देता पळ काढल्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. महामार्गावर वाहतुकीचे नियम पाळले गेले असते तर एक जीव वाचू शकला असता. संबंधित चालक अद्यापही अज्ञात असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या