नीट परीक्षा २०२५
चित्रा न्युज प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर- नीट २०२५ची परीक्षा रविवार दि.४ रोजी होत आहे. शहरातील ४९ केंद्रांवर १९ हजार ५०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने सज्जता केली असून या पुर्व तयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला.
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात National Eligibility Cu, Entrance Test (NEET) नीट २०२५ ही परीक्षा रविवार दि.४ रोजी दुपारी २ ते ५ या वेळात होत आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रांवर करावयाची सज्जता, उपाययोजना याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला. उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल यादव, रविंद्र राणा, श्रीमती वैशाली जोशी तसेच सर्व परीक्षा केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सुचना दिल्या की, प्रत्येक परीक्षा केंद्र सीसीटीव्हीने जोडलेले असून प्रत्येक परीक्षार्थी प्रवेश करते वेळी त्याची तपासणी केली जाईल. कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कुणीही सोबत बाळगणार नाही याची खातरजमा केली जाईल. दुपारची वेळ असल्याने विद्यार्थी यांना सावलीची व्यवस्था केली जाईल. प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थी हा किमान एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचेल अशा बेताने घरुन निघेल. बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यासाठी बसस्थानक व रेल्वेस्थानक येथे सिटी बसेस ठेवण्याचे नियोजन सुरु असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून परीक्षा केंद्रावर एक मेडीकल टिम तैनात असेल. वाढत्या उन्हामुळे कुणालाही काही त्रास झाल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले. परीक्षा पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
0 टिप्पण्या