चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी तालुका पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी मौजे बावी आ येथे केलेल्या कारवाईत १० सीलबंद दारूच्या बाटल्यांसह सुमारे ७०० रुपयांचा माल जप्त केला असून, या प्रकरणी मलग शहा सुलतान कोरबु (रा. बावी आ, ता. बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल गोविंद तुकाराम बचुटे (बकल नं. १०९९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(ई) अंतर्गत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक १३१/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
१३ मे रोजी सायंकाळी सुमारे ७:१० वाजण्याच्या सुमारास, प्रभारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस पथक पानगाव बीट हद्दीत गस्त घालत असताना त्यांना बातमी मिळाली की, मौजे बावी आ येथे इरफान चिकन सेंटरच्या पाठीमागे एक इसम बेकायदेशीररीत्या दारूची विक्री करत आहे. त्यानुसार पोलीस कर्मचारी पोना १८२२ कावळे, पोकॉ १९९५ शेलार आणि पंचांसह घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी एक इसम लाईटच्या उजेडात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन बसलेला आढळून आला. पोलीस पाहताच तो पिशवी तिथेच सोडून पळून गेला. पंचांसमोर त्या पिशवीची तपासणी केली असता, तिच्यात टॅन्गो पंच कंपनीच्या प्रत्येकी ७० रुपये किमतीच्या १० सीलबंद दारूच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी यापैकी एक बाटली सॅम्पल म्हणून पंचासमोरच जप्त केली.
पळून गेलेल्या इसमाची माहिती घेतली असता त्याचे नाव मलग शहा सुलतान कोरबु असून तो बावी आ गावचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्याने बेकायदेशीररीत्या दारू बाळगल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.
0 टिप्पण्या