चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी येथील एका शेतकऱ्याच्या मालकीची मोटारसायकल त्यांच्या राहत्या घराच्या मागील पत्राशेडमधून अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
याप्रकरणी कृष्णा दशरथ बारंगुळे (वय ३० वर्षे, व्यवसाय शेती, रा. नागोबाचीवाडी, ता. बार्शी) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासमवेत नागोबाचीवाडी येथे राहतात. त्यांनी २०१८ साली घरगुती वापरासाठी त्यांच्या वडिलांच्या नावे (दशरथ आगतराव बारंगुळे) हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स कंपनीची मोटारसायकल (नोंदणी क्रमांक MH-13-CZ-2126) खरेदी केली होती. ही मोटारसायकल फिर्यादी स्वतः वापरत होते.
दि. ०४ मे २०२५ रोजी दुपारी सुमारास त्यांनी सदर मोटारसायकल घराच्या मागील पत्राशेडमध्ये उभी करून, पुणे येथे मित्राच्या लग्नासाठी गेले होते. लग्न समारंभानंतर ते दि. ०५ मे रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजता घरी परतले असता, मोटारसायकल आपल्या जागीच असल्याचे त्यांना दिसून आले. मात्र, दिनांक ०६ मे २०२५ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता शेतात जाण्यासाठी मोटारसायकलकडे गेले असता, ती शेडमधून गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यावेळी त्यांनी परिसरात तसेच गावच्या शिवारात मोटारसायकलचा शोध घेतला. मित्र सुर्यकांत येळे, सागर बारंगुळे व अजित बसाटे यांच्या मदतीनेही शोध घेतला; मात्र मोटारसायकल कुठेही सापडली नाही. या घटनेवरून त्यांच्या मोटारसायकलची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची खात्री झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेल्या मोटारसायकलचे सविस्तर वर्णन पुढीलप्रमाणे आहे:
कंपनी व मॉडेल: हिरो एच.एफ. डिलक्स
रंग: काळा, लाल पट्ट्यासह
नोंदणी क्रमांक: MH-13-CZ-2126
चेसिस क्रमांक: MBLHAR231HHM00061
इंजिन क्रमांक: HA11ENHHM00067
अंदाजे किंमत: रुपये ३०,०००/-
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 124/2025 नुसार भारतीय दंड संहिता, भारतीय नवीन विधी संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


0 टिप्पण्या