Ticker

6/recent/ticker-posts

जबरदस्तीने पळवून नेहून मारहाण; व्यापाऱ्याकडून ४ लाख रुपये व सोन्याची चैन हिसकावली

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर– केळी व्यापारातील पैशाच्या वादातून एका व्यापाऱ्याला जबरदस्तीने पळवून नेहून मारहाण करून ४ लाख रुपये रोख आणि गळ्यातील सोन्याची चैन हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी विशाल बापू पवार (रा. लवंग, ता. माळशिरस) व त्याच्यासोबत असलेल्या ६ ते ७ अनोळखी इसमांविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रोहित फुलचंद गुप्ता (वय २९, रा. विरार, जि. ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा ‘एन डी इंटरनॅशनल’ नावाचा केळी निर्यात व्यवसाय असून त्यांनी आरोपी विशाल पवार याच्याकडून पाच कंटेनर केळी खरेदी करून इराण येथे पाठविली होती. मात्र, केळी निकृष्ट दर्जाची असल्याचे इराणमधील खरेदीदारांनी कळवले. त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची जबाबदारी दोघांनी संयुक्तपणे स्वीकारली होती.

मात्र, दि. २४ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.२० वाजता टेंभुर्णीतील श्री हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलेल्या फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना विशाल पवार व त्याचे सहकारी जबरदस्तीने रूममध्ये घुसून शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. “तुझ्याकडे असलेले ३७ लाख रुपये दे” अशी धमकी देत विशाल पवार व इतरांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला बोलेरो गाडीत टाकून कुईवाडी रस्त्याने नेले. वाटेत त्यांनी ४ लाख रुपये रोख व गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली.

दरम्यान, दुसऱ्या गाडीतून फिर्यादीचे दुसरे सहकारी निखील दमामे यांना अकलूज रस्त्याने नेले. या घटनेनंतर ओळखीचे राम महाडिक यांच्या मदतीने फिर्यादी व इतरांना पहाटे २.४० वाजता आरोपींच्या तावडीतून सोडविण्यात आले.

सदर प्रकरणात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात ५ मे २०२५ रोजी रात्री ११.०७ वाजता FIR नंबर 0288 अंतर्गत भा.न्या. संहिता (BNS) 115(2), 119(1), 140(3), 189(2), 190, 191(2), 351(2), 352 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या