• मिरेगाव, भूगाव-विहीरगाव च्या सीमावर्ती भागातील प्रकार
• रेती माफियांना स्थानिक लोकसेवकांचा आशीर्वाद
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन हे अवैध रेती उपसा व वाहतुकीस प्रतिबंध लावण्यास प्रयत्नशील असले तरी स्थानिक लोकसेवकांच्या आशीर्वादाने चूलबंद नदीपात्रातील मिरेगाव तथा भूगाव-विहीरगाव सीमावर्ती भागात पळसगाव, मोगरा,सोनमाळा,
मेंढा,मुरमाडी /तुप,पालांदूर, पहाडी ,शिवणी, मिरेगाव, बरडकिन्ही, न्याहारवानी/सासरा व चान्ना येथील रेती तस्कर सक्रिय झाल्याने अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू झाली आहे. याप्रकराणे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान तसेच रेतीघाटानजिकच्या रस्त्यांची दुर्दशा होण्याचे मार्गावर आहे. यावर खनिकर्म, महसूल व पोलिस प्रशासन प्रतिबंध लावण्याचे सौजन्य दाखवील काय ? असा चूलबंद नदिखोऱ्यातील जनतेचा सवाल आहे.
चूलबंद नदी तालुक्याची जीवनदायीनी असून या नदीमुळे लाखनी व साकोली आणि लाखनी व लाखांदूर तालुक्याची दक्षिणपूर्व सीमा निर्धारित होते. या नदीपात्रात मिरेगाव, सोनमाळा, पळसगाव, विहीरगाव, नरव्हा, पाथरी, मरेगाव व वाकल येथे रेती घाट असले तरी शासनाने रेती घाटाचे लिलाव केले नसल्यामुळे रेती तस्करांकडून रात्रीचे सुमारास अवैध रेती उपसा व वाहतूक राजरोषपणे सुरू होती. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन रुजू होताच रेती तस्करांच्या मुसक्या आवळून रेती तस्करीस लगाम लावला होता. रात्रीचे सुमारास रेती उपसा केल्याने शासनाने ठरवून दिलेल्या खोलीपेक्षा अधिक खोल रेती उपसा केला जात असल्यामुळे नदी पात्रातील भूगर्भात पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच नदी काठावरील गावातील पाणी पुरवठा योजनांना आवश्यक ते पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे नदी घाटालगतच्या रस्त्यांची दुर्दशा झाली असून गावकऱ्यांना आवागमन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. अवैध रेती वाहतुकीने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असला तरी प्रशासन मात्र बघ्याची भुमिका घेत आहे. पोलिस विभागाकडून कारवाईचे भीतीपोटी चूलबंद रेती घाटातून रेती उपसा व वाहतूक बंद झाली होती. पण आता मिरेगाव, भूगाव-विहीरगाव रेती घाटाच्या सीमावर्ती भागात पुन्हा रेती तस्कर सक्रिय झाल्याने भूगाव-विहीरगाव च्या सीमावर्ती भागातून पळसगाव,मोगरा,सोनमाळा
मेंढा,मुरमाडी /तुप,पालांदूर, पहाडी व शिवणी येथील रेती तस्करांकडून तसेच मिरेगाव रेती घाटातून बरडकिन्ही, न्याहारवानी/सासरा, मिरेगाव व चान्ना येथील रेती तस्कर सक्रिय झाले असून चुलबंद नदीपात्रातून अवैध रेती उपसा व ओव्हरलोड वाहतूक सुरू झाल्याने पोलिस विभागासह महसूल व खनिकर्म विभागाने रेती तस्करांच्या मुसक्या आवळून रेती तस्करांवर प्रतिबंध लावणे आवश्यक झाले आहे.
0 टिप्पण्या