Ticker

6/recent/ticker-posts

ब्रिटिशकालीन तुमसर टाऊन रेल्वे स्टेशनची दयनीय अवस्था, त्वरित विकास व पर्वतीय ट्रेनला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याची ग्रीन हेरिटेजची मागणी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा  :-द.पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या तुमसर टाऊन रेल्वे स्टेशनची अवस्था फारच वाईट झाली आहे. सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना उन्हात, पावसात उघड्यावर किंवा झाडाच्या खाली उभं राहून, तसेच बाबाआदमच्या काळातील मोडकळस झालेल्या बाकांवर बसून ट्रेनची वाट पाहावी लागते. अलीकडेच ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशन कडून या रेल्वे स्टेशन परिसर चा फेरफटका मारला असता, ही दृष्ये समोर आली.

तुमसर ते तिरोडी रेल्वेमार्गाची स्थापना १९१६ मध्ये झाली. याला पूर्वी "तुमसर-कटंगी लाइट रेल्वे" म्हणून ओळखले जायचे. नंतर याला "तुमसर-तिरोडी लाइट रेल्वे स्टेशन" म्हणून संबोधले जाऊ लागले. ब्रिटीश काळात डोंगरी बुजुर्क (एशियातील प्रसिद्ध मँगॅनीज खाण), चिखला माईन्स यांसारख्या ठिकाणाहून मँगॅनीजचे खनिज वाहतुकीसाठी तुमसर रोड-तिरोडी ब्रॉडगेज रेल्वे चालविण्यात आली. नंतर प्रवाशांसाठी सुरू झालेली ही ट्रेन “गरीबांची लाईफलाईन” म्हणून ओळखली जाऊ लागली.
तुमसर टाऊन स्टेशन हे बिलासपूर-नागपूर विभागातील तुमसर रोड-तिरोडी मार्गावर असलेले एक ब्रॉडगेज स्टेशन आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांना जोडणारा हा मुख्य रेल्वेमार्ग हिरव्यागार रमणीय जंगलातून व पर्वतीय भागांतून जातो. सतपुडा पर्वतरांगांमधून जाणारी ही सर्वात जुनी तुमसर रोड-तिरोडी रेल्वे लाईन जागतिक वारसा बनू शकते. मात्र या दिशेने दुर्लक्ष होत आहे, असे ग्रीन हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक सईद शेख यांनी सांगितले.

येथे अतिरिक्त रेल्वे ट्रॅक व सोयीसुविधांचा पूर्ण अभाव आहे. सिंगल लाईनमुळे व अतिरिक्त ट्रॅक नसल्याने १२ एप्रिल २०२५ रोजी तुमसर-तिरोडी ट्रेन जाणाऱ्या मालगाडी करिता बैलगाडीप्रमाणे चालवली गेली आणि लहान मुले, महिला व वृद्ध प्रवाशांना ४ तासांहून अधिक काळ त्रास सहन करावा लागला.

या मार्गावरून देव्हाडी-तिरोडी, तिरोडी-देव्हाडी, इतवारी-बालाघाट, तिरोडी-इतवारी, इतवारी-तिरोडी, देव्हाडी-तिरोडी ई ट्रेन चालतात. तुमसर-तिरोडी दरम्यान मिटेवानी, चिचोली, गोबरवाही, डोंगरी बुजुरुक, महकेपार, सुकळी, तिरोडी स्टॉपसाठी तिकिट मिळते.
तुमसर टाऊनची ब्रिटिशकालीन इमारत असून १५ वर्षांपासून येथे ठेकेदार पद्धतीने तिकिट विक्री सुरू आहे. बाजूलाच एक जुना, गलिच्छ आणि लहानशी खोली असून तिथे लोक लघुशंका करतात. स्टेशन मास्टरही ठेकेदाराच्या अंतर्गत काम करत असून जुनाट खोलीत आपली शिफ्ट ड्युटी पार पाडत आहेत. रेल्वे विभागाने जरी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्या केवळ मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित आहेत.

अमृत भारत योजनेत भंडारा रोड व तुमसर रोड स्टेशनचा समावेश असून काही सुविधा निर्माण झाली आहे .भारतीय रेल्वे प्रवासी केंद्र, तुमसर (सीताराम जोशी व इतर) देखील तुमसर रोड,तुमसर टाऊन येथिल सोई, सुविधा निर्माण कामासाठी कार्यरत आहेत.

अमृत भारत अंतर्गत वंदे भारत गोंदिया येथे थांबते पण इतर ठिकाणी नाही. नागपूर-बिलासपूरसह तुमसर रोड, भंडारा रोड येथे ही थांबायला हवी. सिकंदराबाद-रायपूर-नागपूर-सिकंदराबाद, बीकानेर सुपरफास्ट-बिलासपूर, पुरी-जोधपूर या ट्रेन तुमसर रोड येथे थांबाव्यात अशी मागणी आहे. महाराष्ट्रातील १३२ ठिकाणांना अद्ययावत आणि आरामदायी सुविधा पुरवण्याचा निर्णय झाला असून भंडारा रोड व तुमसर रोडसाठी कोट्यवधींची निधी मंजूर झाली आहे.पण तुमसर टाऊन करिता अनेक वर्षापासून केवळ घोषणाच होत आहेत.तुमसर_रामटेक ४६.५० की. मी.प्रस्तावित नवीन ब्रॉडगेज चां अहवाल ५ एप्रिल २०१६ लां रेल्वे बोर्ड ला पाठवून त्याचे सर्वेक्षण ही झाले, प्रकल्पासाठी ५४८ कोटी चां निधी प्रस्तावित असून तुमसर_रामटेक रेल्वे मार्ग वर तुमसर चे आंधळगाव,कांद्री नागपूर जिल्ह्याचे महादुला येथे नवीन रेल्वे स्टेशन प्रस्तावित आहेत.हे मार्ग बनल्यास ग्रामीण क्षेत्राची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होवून व्यापार,उद्योग ही वाढेल.
तुमसर-तिरोडी-बालाघाट तसेच जबलपूर व इतर ठिकाणी दुहेरी लाईन, उंच प्लेटफॉर्म, पूल, प्रतीक्षालय, शेड्स, आरक्षण सुविधा अशा सुविधा देऊन तुमसर टाऊनला पूर्ण स्टेशनचा दर्जा द्यावा,तुमसर_रामटेक प्रस्तावित नवीन ब्रोडगेज रेलमार्ग चे काम तत्काळ सुरू करणे,ज्या प्रकारे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, नीलगिरी माउंटन रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांना युनेस्कोने जागतिक वारसाचा दर्जा दिला आहे, त्याचप्रमाणे तुमसर-तिरोडी पर्वतीय रेल्वेलाही जागतिक वारसा सूची मध्ये समाविष्ट करावे, यासाठी ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशन भंडारा येथून लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव, भारत सरकार, नवी दिल्ली यांना पत्र पाठविण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या