चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:- शहरातील लक्ष्मी मार्केटच्या पाठीमागील बाजूस एका इसमास गांजाचे सेवन करताना फौजदार चावडी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे परिसरात अवैध अंमली पदार्थांच्या वापराबाबत निर्माण झालेल्या चिंता पुन्हा समोर आल्या आहेत.
फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार सुरज शिवाजी सोनवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 मे 2025 रोजी रात्री 8.30 वाजता फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथक पेट्रोलिंग करत असताना लक्ष्मी मार्केटच्या मागील भागात एक इसम संशयास्पद अवस्थेत दिसून आला. सदर व्यक्ती आपल्या हाताच्या अंगठ्याने काही पदार्थ मळून चोळून तो मातीच्या चिलीममध्ये भरून तो काडीने पेटवत होता आणि त्याचा धूर तोंडाने ओढून नाकातोंडातून बाहेर सोडत होता.
पोलीसांनी पंचांना बोलावून त्या व्यक्तीच्या हालचाली 10-15 मिनिटे निरीक्षणात घेतल्या. त्यानंतर खात्री झाल्यावर त्यास अटक करण्यात आली. अटक केलेल्या इसमाचे नाव रसुल सैफन शेख (वय 45 वर्षे, राहणार मुल्ला बाबा टेकडी, लक्ष्मी मार्केट, सोलापूर) असे आहे. त्याच्याकडून गांजाचे सेवन करताना उपयोगात आणलेली मातीची चिलीम, छापीचा कपडा व जळालेल्या कांड्या आढळून आल्या. हे सर्व साहित्य पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसुल शेख याने स्वतः गांजाचे सेवन केल्याची कबुली दिली असून, अंगझडतीदरम्यान त्याच्याकडे कोणतीही मौल्यवान वस्तू आढळून आली नाही. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 0312 अंतर्गत एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम 8(क) आणि 27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सोलापूर शहरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या वापरावर पोलिसांचे लक्ष असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
0 टिप्पण्या