Ticker

6/recent/ticker-posts

बार्शी तालुक्यात ७३ वर्षीय इसमाकडून देशी दारूचा साठा जप्त

 लक्ष्याचीवाडीमध्ये पोलिसांची कारवाई


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लक्ष्याचीवाडी या गावात एक वृद्ध इसम त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला देशी दारूची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई २६ मे रोजी संध्याकाळी ५:२० च्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत ७३ वर्षीय लक्ष्मण उत्तम पवार, रा. लक्ष्याचीवाडी, याच्याकडून देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पोलीस नाईक राहुल मोतीराम बोंदर (वय ३० वर्षे) यांनी फिर्याद दिली असून, ते आणि पोसई भालेराव, पोहेकॉ १५७५ बोबडे, पोकॉ १७५ खांडेकर हे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी लक्ष्मण पवार आपल्या घराच्या आडोशाला देशी दारूची विक्री करत आहे.

त्यावर विश्वास ठेवून पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेतले व खाजगी वाहनातून घटनास्थळी गेले. काही अंतर वाहन उभे ठेवून पायी चालत त्यांनी ठिकाण गाठले असता, एक इसम पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी घेऊन बसलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला पकडून विचारणा केली असता, त्याने आपले नाव लक्ष्मण उत्तम पवार (वय ७३ वर्षे) असल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्याच्याकडे परवाना आहे का, असे विचारल्यावर त्याने कोणताही शासकीय परवाना नसल्याचे कबूल केले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता, १० काचेच्या सिलबंद बाटल्यांमध्ये 'टँगो पंच कंपनी' या ब्रँडची देशी दारू आढळली. प्रत्येक बाटलीची किंमत ७० रुपये असून, एकूण मालाची किंमत ७०० रुपये इतकी आहे.

तत्काळ या देशी दारूच्या बाटल्यांना जप्त करण्यात आले. तपासासाठी १८० मिलीची एक बाटली सॅम्पल म्हणून वेगळी काढून, सर्व बाटल्या पंच आणि पोलिसांच्या उपस्थितीत सील करण्यात आल्या.

या प्रकरणात लक्ष्मण पवार याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अंतर्गत कलम ६५ (ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 0162/2025 म्हणून दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या