Ticker

देवकार्याला आलेल्या कुटुंबातील १६ वर्षीय मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापुर— अक्कलकोट तालुक्यातील डिग्गेवाडी येथे नातेवाईकांकडे देवकार्यासाठी आलेल्या कुटुंबातील १६ वर्षीय मुलगी रात्रीच्या वेळेस रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एका मजुरी करणाऱ्या कुटुंबाने दिनांक 16 मे 2025 रोजी अक्कलकोट तालुक्यातील डिग्गेवाडी येथे नातेवाईकांच्या घरी देवकार्याला उपस्थिती लावली होती. 20 मे रोजी देवकार्य पार पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास मुलगी घराबाहेर झोपलेली असताना ती अचानक बेपत्ता झाली.

पहाटे सुमारे तीन वाजता तिचे वडील जागे झाल्यानंतर त्यांनी मुलगी झोपलेल्या ठिकाणी पाहिले असता ती आढळून आली नाही. तत्काळ त्यांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांना जागे करून शोधाशोध केली. परंतु मुलगी सापडली नाही.

या प्रकरणी संबंधित कुटुंबाने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणास्तव त्यांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आहे, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 137 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अक्कलकोट दक्षिण पोलीस करीत आहेत. अद्याप आरोपीची ओळख पटलेली नाही.

पोलीसांचे आवाहन – सदर प्रकरणात नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या