Ticker

6/recent/ticker-posts

वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रात महिला विकास विभागाचा स्तुत्य उपक्रम

चित्रा न्युज प्रतिनिधी 

मुंबई, अंधेरी (प.) – महिला विकास विभागाच्या वतीने आयोजित वधू-वर व घटस्फोटित परिचय मेळावा अंधेरी (प.) येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रात उत्साहात पार पडला. समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या उपक्रमाला इच्छुक वधू-वरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सामाजिकदृष्ट्या उपयुक्त उपक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान विजय जाधव यांनी भूषवले.

कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. प्रारंभी आयुष्यमती पुष्पा धाकतोडे यांनी या उपक्रमामागील सामाजिक उद्देश विशद करताना सांगितले की, जोडीदार निवडताना केवळ पैशांची श्रीमंती न पाहता मनाची श्रीमंती अधिक महत्त्वाची असते. कारण अंत:करणातील संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि विचारांची समृध्दी हीच खऱ्या अर्थाने आयुष्य सुखी, समाधानी आणि स्थिर करण्यास मदत करते, असे त्यांनी ठामपणे सांगितले. संस्थेच्या विश्वस्त आयुष्यमती नीना हरीनामे यांनी संस्थेचा परिचय थोडक्यात करून दिला.

प्रास्ताविकानंतर अध्यक्ष विजय जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, “जीवनसाथी निवडताना समजूतदारपणा आणि विवेक ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे. जर हा उद्देश साध्य झाला, तर आमचा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल.” त्यांनी यावेळी माहिती दिली की, महिला विकास विभागामार्फत दर शनिवार व रविवार वधू-वर सूचक मंडळ नियमितपणे कार्यरत असून, त्याचा लाभ इच्छुकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

विचारमंचावर संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष नितीन सोनवणे, विश्वस्त नीना हरीनामे पुष्पा धाकतोडे, आणि ज्ञानेश्वर ठोकळे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान वधू-वरांचा मंचावर बोलावून सविस्तर परिचय करून देण्यात आला, त्यामुळे परस्पर संवादाला चालना मिळाली आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्वाची ओळख समजून घेण्यास मदत झाली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आयुष्यमान ज्ञानेश्वर ठोकळे गुरुजी यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करत सांगितले, “मनावर घेतलं तर मनासारखं घडतं,” असा सकारात्मक कानमंत्र त्यांनी उपस्थितांना दिला. तसेच आपल्या आभारप्रदर्शनात आयोजक, सहभागी व सर्व उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले.

कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त आयु. संजय जाधव आणि आयु. सुनील वाघ यांचीही उपस्थिती लाभली. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सरचिटणीस आयुष्यमान चंद्रकांत बच्छाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेमागे महिला विकास विभागाच्या कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले. विशेषता: तारा बोधवडे, अंजना गवळे, छाया बनसोडे, लता परुळेकर, सुमन रणशूर, शलाका मखीजा, वैशाली बच्छाव, संघमित्रा कर्डक, रंजना गायकवाड, ज्योती बोरकर, रजनी वानखेडे, उषा रामटेके आणि मीनल बच्छाव यांनी अतिशय समर्पितपणे भूमिका बजावली.

या समाजाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, उपस्थितांनी समाधान व्यक्त करून आयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या