चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-कुसळंब ते पांगरी मार्गावर शिवाजी कांबळे यांच्या जुन्या कारखान्याजवळ दुचाकीच्या धडकेत एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त इसम आपल्या पत्नीसमवेत पायी चालत असताना ही घटना घडली. संबंधित दुचाकीस्वार देखील अपघातात जखमी झाला असून, बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्या व त्यांचे पती हे दोघे मजुरीचे काम करून घरी परतत होते. दिनांक २५ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता, दोघे मिळून धनाजी गादेकर यांच्या शेतात मजुरीसाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर सायंकाळी ते सायकल हातात घेत पायी चालत परतत होते.
सायंकाळी सुमारे ५.३० वाजता, कुसळंब–पांगरी डांबरी रस्त्यावरील शिवाजी कांबळे यांच्या जुन्या कारखान्याजवळ पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांच्या पतीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर खाली पडले व गंभीर जखमी झाले. त्यांना डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकीस्वार देखील खाली पडून जखमी झाला.
घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी जखमींना ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे नेले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर पतीस मृत घोषित केले.
दुचाकीस्वाराचे नाव विनायक धनंजय क्षीरसागर (रा. पुरी, ता. बार्शी) असे असून, त्याच्याकडील दुचाकी क्रमांक MH 13 CC 7597 आहे. सदर अपघात दुचाकीस्वाराने वाहन अविचाराने, भरधाव वेगात आणि रस्त्याची स्थिती न पाहता चालवल्यामुळे घडल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या अपघातात दुचाकीचे अंदाजे ५,००० रुपयांचे नुकसानही झाले आहे.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे
0 टिप्पण्या