बुलढाण्यातील तलाठ्याची रंगेहाथ अटक; सेवानिवृत्तीपूर्वीच कारकीर्दीचा कलंक
चित्रा न्युज प्रतिनिधी
बुलढाणा :-निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा असतानाही प्रामाणिकपणाचा मार्ग सोडून लाच मागणाऱ्या एका तलाठ्याला आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. रावसाहेब काकडे (तलाठी) असे या अटकेतील अधिकाऱ्याचे नाव असून, येत्या महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र, सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग पत्करल्यामुळे त्यांच्या संपूर्ण सेवाकारकिर्दीवर कलंक लागला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या तलाठी रावसाहेब काकडे यांनी एका शेतकऱ्याची वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेसाठी ७,००० रुपयांची लाच मागितली होती. या लाच मागण्याच्या तक्रारीची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) पोहोचली आणि त्यांनी तत्काळ सापळा रचला.
२३ जून रोजी सापळा रचून काकडे यांना शेतकऱ्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याच प्रकरणात महसूल सहाय्यक मनोज झिने यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.
रावसाहेब काकडे हे अवघ्या एका महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते. मात्र, आता लाच प्रकरणात अटकेमुळे त्यांच्यावर विभागीय चौकशी होणार आहे. नियमांनुसार दोषी ठरल्यास त्यांना निवृत्तिवेतन, ग्रॅच्युइटी आणि अन्य लाभ नाकारले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
एकीकडे महसूल विभागात पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच अशा घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासनातील विश्वास डळमळीत होतो आहे. विशेषतः जमीनसंबंधित कामकाजात लाच मागणे हे गंभीर प्रकारात मोडते. त्यामुळे कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
ACBने दोघांवरही लाच प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणी अधिकारी सहभागी होते का, याचीही चौकशी केली जात आहे.
0 टिप्पण्या