५२ वर्षापूर्वीच्या आश्रमशाळेच्या जागेला व इमारतीला अखेर मंजूरी
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार : ५२ वर्षां पूर्वी सुरू झालेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहाणा तालुका शहादा या आश्रमशाळेची शासकीय इमारत बांधकाम व्हावे व शाळेसाठी जागा मंजुरीस टाळाटाळ करणा-या वन अधिका-याला निलंबित करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली होती.या शाळेच्या जागेसाठी व इमारतीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदूरबार, वनविभाग शहादा, वनविभाग नंदुरबार या कार्यालयाकडे शहाणा गावाचे सुपूत्र तथा बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्यासह अनेक बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता.या कामात काही पुढा-यांनी आडकाठी घातली होती.होणारे काम पुढारी बिघडवत होते.जागे अभावी ही आश्रमशाळा शहाणा या गांवातून वडगांव येथे स्थलांतरित होणार होती.अखेर बिरसा फायटर्सच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व दबावामुळे आश्रमशाळेसाठी जागेची मंजूरी मिळाली आहे व इमारत सुद्धा प्रस्तावित करण्यात आली आहे.संतोष सस्ते,उपवनसंरक्षक, नंदुरबार वनविभाग यांनी १६ मे २०२५ रोजी शहाणा येथील आश्रमशाळेसाठी जागा मंजुरीचा आदेश दिला आहे.
५२ वर्षां पूर्वी सुरू झालेल्या शहादा तालुक्यातील शहाणा येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळेला अद्याप शासकीय इमारत नाही.शाळा खाजगी भाड्यांच्या इमारतीत भरते.आदिवासी मुलं उन्हा तान्हात व पावसात भिजत जेवतात व शिकतात. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदूरबार अंतर्गत एकुण ३२ शासकीय आदिवासी आश्रम शाळांचा समावेश होतो.त्यापैकी २७ शाळांना शासकीय इमारत आहे,४ शाळांचे इमारत बांधकाम सुरू आहे.फक्त शहाणा येथील आश्रमशाळेला अद्याप इमारत नाही.खाजगी इमारतीची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे विद्यार्थांचे हाल होत आहेत.
सरकार विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहे.परंतु सर्वसामान्यांपर्यंत सोयी सुविधा पोहोचत नाहीत, त्याचे हे चित्र आहे.आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. परंतु ५२ वर्षे झाले तरी आदिवासी विकास विभागाचे शासन शहाणा आश्रमशाळेला इमारत देऊ शकले नाही.आदिवासी विकास विभागाला दरवर्षी हजारों कोटी रूपये निधी दिला जातो,तरीही शहाणा सारख्या गावात आश्रमशाळेला अद्याप इमारत नाही.ही एक दुर्दैवाची बाब आहे.शाळेला इमारत नसल्यामुळे विद्यार्थांना भौतिक सुविधांचा अभावाने शैक्षणिक नुकसान होत आहे.वनविभागाची शाळा इमारत बांधकाम करण्यासाठी जागेची मंजूरी मिळालेली आहे.तरी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहाणा ता.शहादा या आश्रमशाळेला लवकरात लवकर इमारत बांधून मिळावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या