Ticker

6/recent/ticker-posts

संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळयाचे जामखेडला उत्साहात स्वागत...


जामखेडला पहिले गोल रिंगण संपन्न...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/ 9615179615
 
जामखेड :- संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे पहिले रिंगण जामखेड शहरालगत जमादारवाडी  येथील संत वामनभाऊ गड येथे शुक्रवारी (ता.२७)  दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी परिसरातून भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या भव्य दिव्य सोहळ्याने आलेल्या भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. 

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत  विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.२५)  श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी,मातकुळी असा प्रवास करत शुक्रवारी जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे सकाळी दिंडी दाखल झाली. जामखेड शहरात आगमन होताच, तपनेश्वर येथे श्रीनागेश्वर भजनी मंडळाने टाळ मृदंग विना घेऊन भजन करत दिंडीला सामोरे जाऊन, दिंडीचे स्वागत केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिंडीचे स्वागत करूत, सहभागी  झाले.  यावेळी महंत विठ्ठल महाराज यांनी सभापती राम शिंदे यांना सन्मानाने आपल्या शेजारी रथात बसविले व तपनेश्वर ते विठ्ठल मंदिर असा प्रवास केला.

दरम्यान शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांना  नागरिकांनी फळे, चहा बिस्कीट,औषध , पाणी व्यवस्था केली होती. शहरातील श्रीविठ्ठल मंदिरात श्रीविठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. तेथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर जगदाळेवस्ती येथे दिंडीसाठी पंगत झाली .

 जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर येथे पालखीचे आगमन झाले. यावेळी जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांचा सन्मान करण्यात आला व रिंगण सोहळा सुरू झाला. मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विट्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गहिनीनाथ महाराज की जय, संत वामनभाऊ महाराज की जय , या जयघोषात  भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. यावेळी भाविकांनी एकच जय जयकार केला.

वारकरी परंपरेचे खेळिया प्रकरणातील अभंग झाले. या अभंगाच्या चालीवर अनेक पुरुष व महिला भक्तांनी फुगडीचा आनंद लुटला.  यावेळी जमादारवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिंगण सोहळ्या दरम्यान या ठिकाणी नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.

जामखेड परिसरातून पंढरपूरला दररोज अनेक दिंड्या जात आहेत. मात्र त्यापैकी संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळा हा सर्वात भव्य दिव्य समजला जातो.  जमादारवाडी येथे होणारे रिंगण हे एकमेव आहे. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. राज्यभरातून सुमारे ३५ हजाराहून आधिक वारकरी हे या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे दुपारचे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या